लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: महापालिकेच्या सेवेत तृतीयपंथींंची कंत्राटी सेवक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली असून महापालिकेच्या मिळकतींच्या संरक्षणासाठी प्रायोगिक तत्वावर २५ तृतीयपंथींची नियुक्ती ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे.
नागरिक हक्क कायद्यानुसार समाजातील सर्वच घटनांना समानतेची वागणूक मिळावी, या उद्देशाने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, महापालिका मुख्य भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मूलन आणि अतिक्रमण विभागाच्या कारवाईसाठी तृतीयपंथींची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि इगल सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनींकडून वेतन तसेच सरकारी देयके तृतीयपंथींना दिली जाणार आहेत.
हेही वाचा… ६० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींतील रहिवाशांसाठी खुशखबर, ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय…
महापालिकेच्या सेवेत तृतीयपंथींची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव सुरक्षा विभागाला देण्यात आला होता. तृतीयपंथींसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची समिती तयार करून महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि तृतीयपंथी कर्मचारी यांच्यात समन्वय रहावा यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. सध्या पंचवीस तृतीयपंथींची नियुक्ती ठेकेदारामार्फत करण्यात येणार असून उर्वरीत नियुक्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिली.