िपपरी महापालिकेने कोटय़वधी रूपये खर्च करून बोटक्लब उद्यानाची उभारणी केली खरी,पण त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पर्यटनस्थळ म्हणून ज्या बोटक्लबचा कौतुकाने उल्लेख होतो, ते ठिकाण म्हणजे प्रेमी युगलांचा सुळसुळाट, जुगाऱ्यांचा ठिय्या व दारूडय़ांचा अड्डा बनले आहे.
थेरगावचे स्थानिक नगरसेवक नीलेश बारणे यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदन दिले असून त्यात उद्यानातील गैरप्रकारांची जंत्रीच मांडली आहे. पुणे परिसरातील नागरिक बोटक्लबवर नौकाविहारासाठी येतात. मात्र, पालिका प्रशासनाचे त्याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. उद्यानात सकाळपासून प्रेमीयुगल येतात, त्यांचे जागोजागी अश्लील चाळे सुरू असतात. उद्यानाच्या जवळच असणाऱ्या केजुदेवी मंदिराजवळ पत्त्याचा डाव चालतो. अंधार पडल्यानंतर दारू पिऊन िधगाणा घालणारी तरूणांची टोळकी जमा होतात. त्यांचा उशिरापर्यंत िधगाणा सुरू असतो. उद्यानाची सफाई ठेकेदारी पध्दतीने देण्यात आली आहे. तो ठेकेदार व्यवस्थित काम करत नाही, त्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. कारंजे व धबधबे बंद अवस्थेत आहेत. पाण्यात झाडांचा पाला साचलेला असतो, तो काढण्यात येत नाही. याशिवाय, वाल्हेकरवाडी, ताथवडे येथील गटाराचे पाणी थेट नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीतील पाण्याला दरुगधी येत आहे. पाण्यात जलपर्णी साचली आहे. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, असे बारणे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.