लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील नाट्यगृहांच्या तारखांचे ऑनलाइन आरक्षण करण्यासंदर्भात महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने विकसित केलेल्या ‘रंगयात्रा ॲप’च्या माध्यमातून पारदर्शकतेला प्राधान्य देण्यात आले असून कर्मचाऱ्यांची कामाच्या अतिरिक्त ताणापासूनही मुक्तता होणार असल्याचा दावा रंगयात्री ॲपच्या निर्मात्यांसह महापालिका प्रशासनाने केला आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पुणे महापालिका ही देशातील एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.
नाट्यगृहांच्या तारखांचे ऑनलाइन आरक्षण करण्यासंदर्भात महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने विकसित केलेल्या ‘रंगयात्रा ॲप’ची १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महापालिका अखत्यारित असलेल्या नाट्यगृहांच्या तारखांची सद्य:स्थिती संगणकाची एक कळ दाबताच कोणालाही पाहण्याची आणि त्यानुसार नाट्यगृहाच्या तारखेचे आरक्षण करण्याची सुविधा ‘वेदांत एन्टरप्रायझेस‘ने विकसित केलेल्या रंगयात्रा ॲपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, अशी माहिती ‘वेदांत एन्टरप्रायझेस‘चे संचालक प्रसाद निकुंभ यांनी दिली.
मात्र, आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धकांच्या संख्येत भर पडल्यानंतर नाटकांना पुरेशा तारखा मिळणार नाहीत, अशी धास्ती घेत ऑनलाइन पद्धतीने तारखांचे आरक्षण करणाऱ्या रंगयात्रा ॲपची अंमलबजावणी रद्द करण्याच्या मागणीसाठी कलाकार, नाट्यनिर्माते, व्यवस्थापक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराशी आंदोलन केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि रंगकर्मी प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. रंगयात्रा ॲपद्वारे नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांच्या तारखांचे वाटप योग्य प्रकारे होऊ शकणार नाही यासह विविध गोष्टींकडे लक्ष वेधत कलाकार, नाट्यनिर्माते, व्यवस्थापक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे.
रंगयात्रा ॲपचा कलाकार, नाट्यनिर्माते, व्यवस्थापकांना फायदा होणार आहे, असा दावा महापालिका नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांनी केला. सध्याच्या पद्धतीमध्ये नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापकांना बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृह आणि गणेश कला क्रीडा मंच येथील तारखांचे आरक्षण करावयाचे असेल तर प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतंत्र अर्ज सादर करावा लागतो. प्रत्येक नाट्यगृहाच्या तारखांचे आरक्षण करण्यासाठी तेथे जाण्याचे श्रम वाचणार आहेत. संगणकावर एक कळ दाबल्यानंतर शहरातील नाट्यगृहांच्या तारखांविषयीची माहिती त्यांना मिळणार असून कोणती तारीख उपलब्ध आहे त्यानुसार आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. नाट्यगृहाच्या भाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कमही ऑनलाइन भरण्याची सोय करून देण्यात आली आहे, याकडे कामठे यांनी लक्ष वेधले.
नाट्यगृहांच्या तारखांचे आरक्षण करण्यासाठी रंगयात्रा ॲपच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र, तारखांचे चौमाही वाटप करताना नाटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संयोजक मोठ्या संख्येने अर्ज करतील आणि त्याचा परिणाम नाटकांच्या तारखा कमी होण्यावर होईल या गैरसमजातून आंदोलन झाले असावे. पद्धत ऑनलाइन असली तरी आलेल्या अर्जांची तपासणी करून तारखांचे वाटप करण्याची पद्धत जुनीच राहणार आहे. गेल्या वर्षीच्या वाटपामध्ये कोणत्या संस्थेला किती तारखा दिल्या गेल्या होत्या हे ध्यानात घेऊनच तारखांचे वाटप होणार आहे. -सुनील बल्लाळ, महापालिका उपायुक्त, सांस्कृतिक विभाग
ॲपमुळे नेमके काय होणार?
- संगणकावर सर्व नाट्यगृहांतील उपलब्ध तारखांची माहिती उपलब्ध
- अर्जांची ऑनलाइन मान्यता
- एक कळ दाबताच ‘जीएसटी’ अहवाल
- पावती आणि परतावा यांची ई-मेलद्वारे पूर्तता
- जमा आणि खर्चाचे पूर्ण विश्लेषण