दिवसाला १६० गाडय़ांची ये-जा; लोहमार्ग विस्ताराची गरज अधोरेखित

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे- लोणावळा लोहमार्गावरून रेल्वे गाडय़ांच्या वाहतुकीची क्षमता संपली असून, सध्या या मार्गावर क्षमतेपेक्षा कित्येक पटीने अधिक गाडय़ांची वाहतूक केली जात आहे. दिवसाला तब्बल १६० गाडय़ा या मार्गावरून ये-जा करीत असताना त्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवून गाडय़ा वेळेवर धावण्यासाठी रेल्वे प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या विस्तारीकरणाची गरजही अधोरेखित झाली असून, हे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पुणे- लोणावळा मार्गावर उपनगरीय लोकल गाडय़ांच्या दररोज सुमारे ४४ फेऱ्या होतात. सुमारे १२० एक्स्प्रेस गाडय़ा आणि २५ ते ३० मालगाडय़ा या मार्गावरून दररोज जातात. त्यात लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा प्रामुख्याने समावेश आहे. लोहमार्गाच्या देखभालीचा दिवसातील काही वेळ वगळता इतर वेळेला अगदी मध्यरात्र ते पहाटेपर्यंतही हा मार्ग व्यस्त असतो. पुणे- लोणावळा मार्गावरील लोकल गाडय़ांची मागणी सध्या वाढते आहे. त्यामुळे या मार्गावर लोकलची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पुणे- मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी गाडय़ा देण्याचीही मागणी कायमची आहे. मात्र, मार्गाची सद्य:स्थिती पाहता एकही नवी गाडी सुरू होऊ शकणार नसल्याचे चित्र आहे.

क्षमतेपेक्षा अधिक गाडय़ांची वाहतूक होत असताना लांब पल्ल्याच्या नव्या गाडय़ांना या मार्गावरून जागा करून देणेही मोठे जिकिरीचे झाले आहे. अशा स्थितीमध्ये लोहमार्गाचे विस्तारीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पुणे- लोणावळा मार्गाच्या विस्तारीकरणाची चर्चा मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. विस्तारीकरणाच्या कामाचा रेल्वे अर्थसंकल्पातही समावेश करण्यात आला आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने हे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, हा प्रकल्प अत्यंत संथ गतीने पुढे जात असल्याचे वास्तव आहे.

लोहमार्गालगतच्या काही खासगी जागाही ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च मोठा आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकांना या प्रकल्पासाठी निधी देण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, पालिकांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या कामाचे भवितव्य रेल्वे बोर्डाच्या निर्णयावर अवलंबून आहे. वाहतुकीची सध्याची स्थिती पाहता पुणे विभागात रेल्वेच्या सुविधा वाढण्यासाठी विस्तारीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

गाडय़ा वेळेत धावण्यासाठी कसरत

पुणे- लोणावळा मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाडय़ांच्या वेळा पाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. अशाही स्थितीत मागील वर्षांच्या तुलनेत यंदा गाडय़ांच्या वेळा पाळण्याबाबत सुधारणा झाली आहे. याबाबत पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा एक्स्प्रेस गाडय़ा ९१ टक्के, पॅसेंजर ९० टक्के, तर लोकल गाडय़ांच्या वेळा ९४ टक्क्य़ांनी पाळल्या गेल्या. मागील वर्षी ही स्थिती  ८९, ८८ आणि ८६ टक्के होती. देहूरोडपर्यंत स्वयंचलित सिग्नल, १०० किलोमीटर वेगाने धावू शकणारे लोकलचे डबे आदींमुळे ही सुधारणा होऊ शकली. पुणे- लोणावळा मार्गावर गाडय़ा वेळेवर चालविण्यासाठी मुंबई विभागाशी सातत्याने समन्वय ठेवला जातो.

Story img Loader