पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दोन्ही शहरांत मिळून अधिकृत सुमारे १० हजार स्कूलबस आणि व्हॅन आहेत. अनेक स्कूलव्हॅनमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. असे असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) केवळ ६४९ स्कूलबस आणि व्हॅनची तपासणी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील अधिकृत स्कूलबस आणि व्हॅनची संख्या ६ हजार ८९५ आहे. याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील स्कूलबस आणि व्हॅनची संख्या २ हजार ८९० आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत मिळून अधिकृत सुमारे १० हजार स्कूलबस आणि व्हॅन आहेत. यंदा नोव्हेंबरअखेरपर्यंत त्यातील केवळ ३४० स्कूलबस आणि व्हॅनची तपासणी आरटीओने केली. त्यात दोषी आढळलेल्या २०५ स्कूलबस आणि व्हॅनवर कारवाई करून १८.५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्याता आला. याचवेळी विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ३०९ खासगी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्या २१३ वाहनांवर कारवाई करून १६.८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने अवैध विद्यार्थी वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.

हेही वाचा… पुणे: प्रेमसंबंध तोडल्याने अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; येरवडा भागातील घटना

सध्या शहरातील चित्र पाहता स्कूलव्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. व्हॅनला १० विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी असताना त्याहून अधिक जास्त विद्यार्थी व्हॅनमध्ये कोंबले जातात. याबद्दल अनेक वेळा पालकांनी तक्रार करूनही व्हॅनचालक जुमानत नसल्याचे चित्र आहे. भरधाव वेगाने आणि वाहतुकीचे नियम मोडून स्कूलव्हॅन सुसाट सुटल्याचे चित्रही शहरातील रस्त्यांवर वारंवार दिसते. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याचवेळी मागील ३ ते ४ वर्षांपासून अनेक स्कूलव्हॅनला परवानगी देणे थांबविण्यात आले असूनही अनेक नवीन व्हॅन विद्यार्थी वाहतूक करताना दिसत आहेत.

रिक्षातून विद्यार्थी वाहतूक अवैधच

रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करण्यास परवानगी नाही. असे असतानाही सर्रास रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविल्याने अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे. मात्र, एवढ्या धोकादायकरित्या वाहतूक सुरू असूनही त्याकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची डोळेझाक सुरू आहे.

किती विद्यार्थी असावेत…

  • स्कूलबसची क्षमता ४० असल्यास १२ वर्षांखालील ६० विद्यार्थी
  • स्कूलव्हॅनची क्षमता ७ असल्यास १२ वर्षांखालील १० विद्यार्थी

स्कूलबस, व्हॅनवरील आरटीओची कारवाई

  • एकूण ३४० स्कूलबसची तपासणी
  • २०५ स्कूलबसवर कारवाई करून १८.९ लाखांचा दंड
  • अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ३०९ वाहनांची तपासणी
  • अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या २१३ वाहनांवर कारवाई करून १६.८ लाखांचा दंड

स्कूलबस आणि स्कूलव्हॅनच्या तपासणीची मोहीम आमच्याकडून राबविली जात आहे. विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाईचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्कूलबल आणि स्कूलव्हॅनचालकांनी नियमांचा भंग न करता सुरक्षित पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

अधिकृत स्कूलबस आणि स्कूलव्हॅनपेक्षा अनधिकृत स्कूलव्हॅनची संख्या अधिक आहे. स्कूलव्हॅनमधून किती विद्यार्थ्यांची वाहतूक करावी आणि त्याचा दर किती असावा, या बाबी प्रशासनाने ठरवून द्यायला हव्यात. स्कूलव्हॅनचालक आणि पालकांना परवडेल अशा पद्धतीने प्रशासनाने दर निश्चित करावा. – राजन जुनवणे, अध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transportation of school students in pune and pimpri chinchwad continues in a dangerous manner pune print news stj 05 dvr
Show comments