शहरातील वाहतूक समस्येची जबाबदारी झटकणार नसल्याचे स्पष्ट करत वाहतूक हा शहराच्या नगर नियोजनाचाही भाग असल्याचा विसर पडल्याचे मत मांडले. तसेच अरुंद रस्ते, खड्डे, पाणी, मेट्रो, बीआरटी, उड्डाणपुलांची कामे अशा परिस्थितीत केवळ एक तृतीयांश रस्ताच वापरण्यास मिळत असूनही वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले जात असल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिले.
पोलीस आरोग्य मित्र फाउंडेशनतर्फे ‘शतक ‘मोका’चे, कौतुक पुणे पोलिसांचे’ या कार्यक्रमात गुप्ता बोलत होते. ज्योत्स्ना भोळे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी गुप्ता यांच्याशी संवाद साधला. संस्थेच्या अध्यक्षा मनीषा धारणे या वेळी उपस्थित होत्या.
रस्त्यावर पोलिसांचा अभाव असल्याची कबुली देत गुप्ता म्हणाले, की एका इमारतीच्या ठिकाणी दहा इमारती झाल्यास प्रश्न गंभीर होतो, तसेच वाहतुकीचे झाले आहे. वाहतूक नगरनियोजनाचा भाग असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वाहतूक शाखेला अधिक मनुष्यबळ देऊन वाहतूक कोंडी सोडवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.गुन्हेगारांनी स्वतःची कुंडली स्वतः तयार केली. आम्ही केवळ कागदपत्रे आणि कायद्याच्या चौकटीत बसवून त्यांच्यावर कारवाई केली. नियमित गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने पाच विभागांची निर्मिती केल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : लोक करोनाला पार कंटाळले; सीरमच्या १० कोटी लसी गेल्या वाया
उत्सव काळात ध्वनिक्षेपकावर नियंत्रण ठेवता आले नाही
करोनामुळे दोन वर्ष नागरिकांवर निर्बंध असल्याने यंदा उत्सवांना शिथिलता दिली होती. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र या पुढे नक्कीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी गुप्ता म्हणाले. तसेच सायकलस्वार हेल्मेट वापरत असतील, तर दुचाकीस्वारांनीही हेल्मेट घातले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.