थर्ड पार्टी विम्यातील वाढ व इतर विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ट्रक, टेम्पो व खासगी बस वाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य बाबा शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
परिवहन विभागातील सर्वच वाहनांच्या थर्ड पार्टी विम्यामध्ये १ एप्रिलपासून १० टक्क्य़ांची वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ वाहतूक व्यवसायाचा कणा मोडणारी आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असल्याने वाहतूकदारांच्या नफ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. वाढत्या महागाईमुळे व मंदीमुळे वाहतूक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे, असे शिंदे यांनी सांगितले. थर्ड पार्टी विम्याची दरवाढ करू नये, डिझेलच्या किमती काही कालावधीपर्यंत स्थिर ठेवाव्यात आदी मागण्यांबाबत शासनाशी चर्चा करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहतूकदारांनी देशव्यापी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी वाहतूकदारांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.