प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत काही ना काही ताणतणाव असतात. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, नातेसंबंधांतील ताण त्याला भेडसावतात. तर, शारीरिक आजारपण, अपंगत्व, अपघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू यामुळेही काहींना मानसिक तणाव जाणवतात. अशा मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी बापू ट्रस्टच्या सेहेर या नागरी सामुदायिक मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत पहेल-नागरी मन:स्वास्थ्य कल्याण केंद्र (कम्युनिटी वेलनेस सेंटर) मंगळवारपासून (२२ डिसेंबर) कार्यान्वित होत आहे.
कमी उत्पन्न गटासाठी मन:स्वास्थ्य कल्याण केंद्र फायदेशीर ठरली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सोनावणे रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या बापू ट्रस्टला आता पुणे महापालिकेने चिरस्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध करून दिली आहे. सोनावणे रुग्णालय येथे मंगळवारी सकाळी अकरा वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. अशा स्वरूपाच्या आणखी चार केंद्रांना महापालिकेच्या आरोग्य खात्याने मंजुरी दिली आहे. येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटल, मंगळवार पेठ येथील कमला नेहरू रुग्णालय, कोथरूड येथील सुतार दवाखाना आणि बोपोडी येथे ही केंद्र लवकरच सुरू होणार असल्याची माहिती डॉ. नचिकेत मुळे आणि भारती विसाळ यांनी सोमवारी दिली.
पुण्यातील ५० टक्के लोकसंख्या वस्त्यांमध्ये राहते. घरगुती भांडण, कामाच्या ठिकाणचे ताण, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ताण, वाहन चालवितानाचे ताण, व्यायामाचा अभाव, सामाजिक आणि आर्थिक ताण उंचावण्याचा ताण या साऱ्याचा दुष्परिमाम म्हणजे हळूहळू ढासळणारी शारीरिक आणि मानसिक स्थिती. सतत उदास-निराश असणे, भूक न लागणे, झोप न लागणे, अति झोपणे अशा गोष्टी माणसाला सतावतात. आयुष्यात आपण हरलो असे वाटत राहणाऱ्या लोकांना उपचार आणि समुपदेशनाची गरज असते. बापू ट्रस्ट गेली पाच वर्षे या क्षेत्रात काम करीत असून समुपदेशन आणि कलेवर आधारित उपचारपद्धती या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहे. या केंद्राची उपयुक्तता ध्यानात आल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरी मन:स्वास्थ्य कल्याण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचेही विसाळ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा