पिंपरी : जाहिरातीचा लोखंडी सांगाडा (हाेर्डिंग) आणि त्यावरील फलक दिसत नसल्याने वृक्षांची छाटणी किंवा तोडणी करणाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील सात फलकधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. मात्र, शहरात सातत्याने बेकायदापणे वृक्षतोड होत आहे. जाहिरात फलक दिसत नसल्याने झाडांवर कुऱ्हाड चालविली जाते. फलक दिसण्यासाठी अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी आतापर्यंत सात जाहिरात संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. तसेच, अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी नऊ कार्यक्षेत्रांतील पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. काही प्रकरणांची तपासणी सुरू आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, की जाहिरातफलकधारकांनी आपल्या फलकांसमोरील वृक्षांची छाटणी किंवा तोडणी अनधिकृतरीत्या करू नये. महापालिकेच्या परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरातफलकधारकाचा परवाना रद्द केला जाणार आहे. जाहिरातदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. चिखली परिसरामध्ये अनधिकृतरीत्या वृक्षतोडणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree cutting for advertisement boards fir registered pune print news ggy 03 pbs