लहानग्यांचा लाडका ‘चिंटू’ आणि ‘पप्पू’, ‘मिनी’, ‘बगळ्या’, ‘राजू’ ही मित्रांची गँग आता पर्यावरण, पाणी प्रदूषण, वाहतूक समस्या, कचरा व्यवस्थापन अशा विषयांवर बोलणार आहे. खास लहान मुलांसाठीच्या दिनदर्शिकेतून ही मित्रमंडळी भेटणार आहेत.
‘चिंटू’चे निर्माते व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वानंदी प्रकाशनचे मकरंद केळकर, ‘सिनर्जी प्रॉपर्टीज’चे मंदार देवगावकर, ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चे गणेश जाधव, राजेंद्र आवटे, ‘शिक्षण विवेक’चे महेश पोहनेरकर या वेळी उपस्थित होते.
ही दिनदर्शिका जुलै २०१५ ते जून २०१६ अशा शैक्षणिक वर्षांसाठीची असून तिच्या प्रत्येक पानावर पर्यावरणाशी किंवा दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या एका समस्येचे चिंटूच्या व्यंगचित्रातून चित्रण केले आहे. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवले आहेत. यात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे, अभिनेते दिलीप प्रभावळकर, पाणीविषयक कार्यकर्ते राजेंद्र सिंह, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे, गिर्यारोहक कृष्णा पाटील अशा विविध व्यक्तींचा सहभाग आहे. ‘चिंटूच्या चित्रांमधून दिलेला संदेश प्रचारकी न होता सहजतेने मुलांपर्यंत पोहोचवणे हे आव्हानात्मक होते,’ असे चारुहास पंडित यांनी सांगितले.
२८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता गोखले इन्स्टिटय़ूटमधील काळे सभागृहात या दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे. शि. द. फडणीस, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, भूषण गोखले, लेखक व दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले या वेळी उपस्थित राहतील. प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना ही दिनदर्शिका मोफत दिली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण विवेक आणि रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांच्या माध्यमातून ती १८ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा