‘आरोग्यम धनसंपदा’ असे आपण म्हणतो, तेच आपण लावलेल्या वनस्पतींनाही लागू पडते. वनस्पतींच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांचे आरोग्य चांगले राहील याची दक्षता घ्यावी लागते. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे तुकोबांनी सांगितले आहे. उत्तम बियाणे, उत्तम प्रतीचा मातृवृक्ष अथवा उत्तम प्रतीचे रोप लावणे ही प्राथमिक गरज आहे. रोपवाटिकेत रोप निवडताना सशक्त, टवटवीत, दमदार रोप निवडावे, बियांपासून लागवड करत असल्यास टपोरी बी निवडावी.

रोपांची लागवड केल्यावर त्याभोवती नीमपेंड भुरभुरावी. नीमपेंड कुजताना व त्याचे विघटन होताना त्यातून सल्फर डाय ऑक्साईड व फेनोलिक संयुगे बाहेर पडतात, यामुळे सूत्रकृमी या रोगास प्रतिबंध होतो. रोपवाटिकेतून भाज्यांची उदा., वांगी, मिरची, टोमॅटो इ. रोपे आणल्यास ती जेमतेम चार ते सहा इंच उंच असतात. ही रोपे एक फूटभर उंच होईपर्यंत त्यांना पंधरा दिवसांनी एकदा खोडाजवळ राखेचे रिंगण करावे. अथवा राख भुरभुरावी. त्यामुळे नाजूक रोपाचे खोड खाणाऱ्या अळीपासून संरक्षण होते. मावा, पांढरी माशी, मिली बग, खोड अळी, करपा असे विविध रोग, किडी झाडांवर आक्रमण करू शकतात. भरपूर ऊन असेल तर किडी कमी येतात. लक्षात ठेवा, काही किडींना काही झाडे आवडतात. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कर्दळ, जास्वंद, पेरू, आवळा, टोमॅटो यावर हमखास होतो. थोडय़ाच भागावर पांढरी माशी असेल तर तो भाग कापून नष्ट करणे, मातीत नीमपेंड मिसळणे, पण जास्त प्रमाणात झाल्यास पिवळय़ा रंगाच्या प्लॅस्टिकच्या एक इंच पट्टय़ा करून त्यास व्हॅसलीन वा पेट्रोलियम जेली लावून बागेत झाडांना या पट्टय़ा स्टेपलरने अडकवाव्यात. पांढरी माशी पिवळय़ा रंगाकडे आकर्षित होते व पेट्रोलियम जेलीस चिकटते. हा सोपा व स्वस्त उपाय आहे. टोमॅटोसारख्या झाडांचा जीवनक्रम संपत आल्यावर त्या झाडावर पांढरी माशी आक्रमण करते. त्यामुळे झाडाची उत्पादनक्षमता घटली, पानांचा आकार लहान झाला, फुलांची संख्या घटली की रोपे काढून टाकावीत, ज्यामुळे बागेत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होणार नाही.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

पावटावर्गीय वेलांवर मावा हमखास येतो. माव्यामुळे झाडाची उत्पादनक्षमता कमी होते. मावा आल्यास दहा-बारा मिरच्या मिक्सरमधून फिरवून पेस्ट करावी. त्यात एक लीटर पाणी घालून ते गाळून घ्यावे. त्यात एक चमचा साबण पावडर घालून हलवून ते पाणी वेलींवर फवारावे.

झाडाप्रमाणेच किडीचे वाढीचे टप्पे असतात. कीड झाडावर बस्तान बसवते. झाडाचे शोषण करून स्वत:चे पोषण करते. स्वत:ची प्रजा वाढवते. या प्रत्येक टप्प्यावर आपण झाडाचे संरक्षण करू शकतो. पाण्याचा फवारा मारून पाने स्वच्छ ठेवणे, नीमतेलाचा फवारा दोन महिन्यांतून एकदा मारणे, दारात कडुनिंब असेल तर त्याच्या पानांचा रस पाण्यातून फवारणे, तंबाखूची पाने रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घेणे, त्यात १ चमचा साबण पावडर घालून ते पाणी फवारणे.

उग्र वासाच्या पाण्याने कीड झाडापासून दूर जाते. त्याची प्रजननक्षमता कमी होते. नवीन प्रजेची वाढ होत नाही.

परसबागेत झेंडू, पुदिना, लसूण व मोहरी यांना जरूर जागा ठेवा. त्यांच्या उग्र वासाने किडी बागेपासून दूर राहतात. झेंडूमुळे जमिनीतील सूत्रकृमी या रोगाच्या प्रादुर्भावास प्रतिबंध होतो. मोहरीवर कीड प्रथम आक्रमण करते. भुरी रोग मोहरीवर प्रथम येतो. अशा वेळी मोहरीची पाने खुडून नष्ट करावीत, जेणे करून बागेतील इतर झाडांचे रक्षण होते. बागेत झाडांची विविधता ठेवली तरी किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

झाडावर कीड पडणे अथवा बुरशीजन्य वा अन्य संसर्गामुळे झाड रोगग्रस्त होणे यात महत्त्वाचा घटक असतो झाडाची प्रतिकारशक्ती. पेंटर या शास्त्रज्ञाने झाडाच्या प्रतिकारशक्तीविषयी सखोल संशोधन करून निष्कर्ष काढला, की प्रत्येक जातीची प्रतिकारशक्ती, किडींना तोंड देण्याची क्षमता वेगळी असते. जनुकीय बदलानुसार ती बदलते. कीड व झाड यांच्यातील संघर्षांत किडीचे यश, अपयश झाडाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते, हे लक्षात घेतले तर रोगाचा प्रतिबंध करणे सोपे जाते. झाडाचे पोषण माती करते, ही माती सकस, सजीव असेल तर झाड स्वबळावर, स्वसंरक्षण करू शकेल. मग आपण करायचे फक्त प्रतिबंधात्मक उपाय!

बागेतील पक्षी झाडांचे किडीपासून संरक्षण करतात. पावसाळय़ाच्या दिवसांत अथवा जास्त ओल असलेल्या ठिकाणी गोगलगायी होतात. त्या चिमटय़ाने उचलून काढून टाकाव्या लागतात. माझ्याकडे गोगलगायी झाल्यास दोन-तीन भारद्वाज पक्षी येऊन त्या फस्त करून टाकतात. आमचे काम कमी करतात.

झाडे सशक्त, टवटवीत राहण्याची खूप कारणे आहेत. त्यातले एक म्हणजे झाडांशी संवाद. झाडे व्यक्त होतात, त्यांना काय हवे ते खोड, पाने, फुले, फळे सांगतात ते जाणून घ्या. संवाद हे आरोग्याचे मर्म आहे.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)