पिंपरी महापालिकेत १७ वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अजूनही विकासकामे झाली नाहीत, अशी ओरड येथील नगरसेवकांकडून सातत्याने होत असतानाच तळवडय़ातील नगरसेवक शांताराम भालेकर यांनी, ग्रामस्थांना भेडसावणारी एक वेगळीच समस्या गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. दशक्रिया विधीच्या ठिकाणी बिलकूल झाडे नाहीत, म्हणून कावळेही येत नाहीत. त्यामुळे दशक्रियाविधीचा खोळंबा होतो, अशी अडचण त्यांनी सांगताच सर्व जण अवाक् झाले.
‘बेस्ट सिटी’ म्हणून आपला नावलौकिक आहे. लाखभर झाडे लावणार, अशी घोषणा आपण करतो. प्रत्यक्षात ती झाडे कुठे लावली जातात, तेच कळत नाही. तळवडय़ात नदीपात्रालगत झाडे लावा, अशी मागणी आपण सातत्याने करतो, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अंत्यविधी तसेच दशक्रिया विधीसाठी तळवडय़ात येणाऱ्या नागरिकांना उन्हात थांबावे लागते. पात्रालगत झाडे नसल्याने कावळे येत नाहीत. त्यामुळे पुढील अडचणी उद्भवतात, असे ते म्हणाले. कोटय़वधी रुपये खर्च करून आपण सल्लागार नेमले आहेत. मोठमोठय़ा पदव्या घेतलेले अधिकारी आपल्याकडे आहेत. मात्र, त्यांच्याकडून चांगली कामे होत नाहीत. पैसे खर्चूनही बिनकामाचे सल्ले दिले जातात. या ऐवजी पदवी नसतानाही शेतकऱ्याचे ज्ञान चांगले असते, याकडे भालेकर यांनी लक्ष वेधले. तेव्हा अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांना भालेकरांच्या मागणीकडे लक्ष देण्याचे व योग्य कार्यवाहीचे आदेश दिले.

Story img Loader