रस्त्याच्या कडेपर्यंत केलेले काँक्रिटीकरण, झाडांच्या मुळाशी लावलेले पेव्हर ब्लॉक्स यांमुळे झाडांचा श्वास कोंडतो आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उद्यान विभागाकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही.
सध्या रस्त्याच्या कडेला असलेली झाडे आणि त्यांच्या खोडापर्यंत बांधण्यात आलेले पदपथ आणि रस्ते यांमुळे पुण्यातील बहुतेक भागातील वृक्षांची जगण्यासाठी लढाई सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांना वाढण्यासाठी आवश्यक तेवढी जागा राखून न ठेवता त्यांच्या खोडापर्यंत काँक्रिटीकरण केलेले दिसते. त्यामुळे वृक्षांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचत नाही. वृक्षांची वाढ होण्यासाठी पुरेशी जागाही राहत नाही. पूर्ण वाढ न झालेल्या वृक्षाची वाढ खुंटते आणि त्यामुळे वृक्षांचे आयुष्य कमी होते आहे. शहरातील अनेक ठिकाणी वृक्षांना धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा वृक्षांमुळे पदपथांनाही धोका निर्माण झाला आहे.
वास्तविक पदपथांवर ब्लॉक्स बसवताना जुन्या वृक्षाभोवती दीड फूट जागा सोडण्यात यावी. या जागेत काँक्रिटीकरण करू नये असा नियम आहे. या नियमाचे पालन व्हावे यासाठी महापालिका आयुक्तांच्या सहीने परिपत्रकही काढण्यात आले आहे. मात्र, या परिपत्रकाकडे महापालिकेच्या विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. ‘नवीन रस्त्यांवर वृक्ष लागवडीसाठी ४ मीटर अंतरावर खड्डे ठेवण्यात यावेत. पदपथावर ब्लॉक्स बनवताना वृक्षाभोवती पाणी मुरण्यासाठी चारही बाजूने १.५ फूट जागा सोडण्यात यावी. वृक्षाभोवती ब्लॉक बसवण्यात येऊ नयेत, तसेच वृक्षांभोवती खोदाई करताना त्याला कोणत्याही प्रकारची इजा करण्यात येऊ नये,’ असे या परिपत्रकात म्हणण्यात आले आहे. हे परिपत्रक उद्यान विभागाने सर्व विभागांना पाठवले. मात्र, त्याचे पालन होते का, याची खातरजमा करण्यासाठी उद्यान विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे ही कामे करणाऱ्यांवर कारवाईही होत नाही किंवा केलेल्या कामात सुधारणाही होत नाही.
याबाबत उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले, ‘‘वृक्षांभोवती काँक्रिटीकरण करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे वृक्षांना कोणत्याही प्रकारे इजा करण्यात येऊ नये, असा नियम आहे. त्याचे पालन करण्याबाबत महापालिकेच्या विविध विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे. प्रत्येक वृक्षाकडे लक्ष ठेवणे हे व्यवहार्य नाही. त्यामुळे प्रत्येक विभागाने काम करताना जबाबदारीने करणे आवश्यक आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर वृक्षगणना करण्यात येत आहे. त्यामध्येही वृक्षांभोवती जागा सोडण्यात आली आहे का, याचा पाहणी करण्यात येणार आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा