सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील अविभाज्य भाग असलेल्या झाडांची विद्यापीठाकडून सर्रास कत्तल सुरू आहे. विद्यापीठाचा ‘विकास’ करण्यासाठी ही वृक्षतोड सुरू आहे. विद्यापीठाचा परिसराचे विद्रूपीकरण यातून होतेच आहे. मात्र त्याचबरोबर वृक्षतोडीसाठी परवानगीही घेण्यात आलेली नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर हा शैक्षणिक ओळख, इतिहास यांबरोबरच ओळखले जातो ते या आवारातील वृक्षसंपदेसाठी. विद्यापीठाच्या ४११ एकर परिसरातील या निसर्गसंपदेची विद्यापीठ प्रशासनाला मात्र किंमत नसल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या परिसरातील अनेक झाडांची सध्या सर्रास कत्तल सुरू आहे. जेसीबी सारखी यंत्रे लावून अनेक झाडे मुळासकट नष्ट करण्यात येत आहेत. या भागातील सुबाभूळ, बाभूळ, कडूलिंब, चिंच अशी मोठी झाडे विद्यापीठाने तोडली आहेत. झाडे तोडायची, मुळासकट उखडून टाकायची आणि बहुतेक वेळा त्याच जागेत झाडांच्या फांद्याची विल्हेवाट लावायची असा प्रकार सुरू आहे. विद्यापीठाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनजवळील रिकाम्या जागेतील अनेक झाडे दोन दिवसांपूर्वी तोडण्यात आली आहेत. या जागेत ‘भाषा भवन’ उभारण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. ही झाडे तोडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने परवानगीही घेतली नसल्याची माहिती उद्यान विभागाचे विद्यापीठ भागातील मेस्त्री संतोष कांबळे यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार अशाप्रकारे वृक्षतोड करणे बेकायदेशीर आहे. विद्यापीठाच्या आवारातील काही इमारती ओस असताना ‘शैक्षणिक विकासा’साठी नव्या इमारती बांधण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने नव्या नव्या बांधकामांसाठी ही वृक्षतोड सुरूच आहे. दोन वर्षांपूर्वी २०१४ मध्ये महापालिकेच्या उद्यान विभागाकडे विद्यापीठातील वृक्षतोडीबाबत विद्यापीठातील पर्यावरणप्रेमींकडून तक्रार करण्यात आली होती. मे २०१६मध्येही अशाप्रकारची तक्रार करण्यात आली होती. मात्र पंचनामा करण्यापलिकडे उद्यान विभागाकडूनही काहीच कारवाई झालेली नाही.
चंदनाच्या झाडांवरही कुऱ्हाड
विद्यापीठाच्या परिसरात चंदनाची झाडे आहेत. नव्यानेही अनेक ठिकाणी ही झाडे उगवत असतात. चंदनाची झाडे तोडण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या मागेही चंदनाची झाडे होती. ती देखील तोडण्यात आली आहेत. या जागेवर मोठे पत्रे लावून आत झाडे तोडण्याचे काम शुक्रवारपासून सुरू आहे, अशी माहिती काही विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी दिली.
विद्यापीठाच्या परिसरातील झाडे तोडण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या ठिकाणी बरीच झाडे तोडल्याचे दिसत आहे. त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
– संतोष कांबळे, उद्यान विभागाचे मेस्त्री
बांधकामाच्या ठिकाणी मी चार दिवस जाऊ शकलो नाही. त्यामुळे वृक्षतोडीबाबत काही कल्पना नाही. पण त्या ठिकाणी मोठी झाडे नव्हती.
संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ