पुणे : पुण्यातून धावणाऱ्या दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असला, तरी सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट खर्चाच्या दृष्टीने हा प्रवास आवाक्याबाहेर आहे. त्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाकडून सर्वसामान्यांना परवडेल, अशी ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यातून उत्तर भारतातील चार ठिकाणे जोडणाऱ्या मार्गांवर ही रेल्वेगाडी सुरू करण्याची चाचपणी सुरू आहे.
रेल्वे मंत्रालयाने जुलै २०२३ मध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’सारखीच दिसणारी, पण वातानुकूलित नसलेली आणि कमी तिकीट दर असलेली अहमदाबाद ते गांधीनगर ही ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ सुरू केली. कमी खर्चात आणि कमी वेळेत प्रवास करण्याची सुविधा असल्यामुळे या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्या पार्श्वभूमीवर, पुण्यातून उत्तर भारतातील स्थानके जोडणाऱ्या काही मार्गांवर ही गाडी सुरू करण्याच नियोजन आहे. ‘अमृत भारत एक्स्प्रेस’मुळे या मार्गावरील प्रवाशांना माफक दरात सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा >>>पुणे पोलीस दलाच्या बॉम्बशोधक-नाशक पथकातील ‘तेजा’ला भावपूर्ण निरोप
पुणे रेल्वे प्रशासनाकडून ‘अमृत भारत योजनें’तर्गत २० स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे सुरू करण्यात आली असून, ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या डब्यांच्या रचनेप्रमाणे नवीन डबे (कोच) तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. बरीचशी कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी पुण्यात दिली.
माफक दर
पुण्यातून हुबळी आणि कोल्हापूर या दोन मार्गांवर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावते. पुणे-कोल्हापूर या प्रवासासाठी निम्नश्रेणी डब्याकरिता १,१६० रुपये, तर उच्च श्रेणी डब्याकरिता २,००५ रुपये असे आसनशुल्क आकारले जाते. मात्र, ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ला इतर गाड्यांमध्ये शयनकक्षासाठी जो दर आकारला जातो, तेवढेच शुल्क असेल, अशी माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>>उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
या मार्गांची चाचपणी
‘अमृत भारत योजनें’तर्गत पुणे रेल्वे स्थानकाबरोबरच हडपसर रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून दानापूर आणि छप्रा या दोन गाड्या, तर हडपसर रेल्वे स्थानकावरून मुझफ्फरपूर आणि पुरी अशा दोन गाड्यांचा मार्ग निश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.
पुण्यातील अमृत भारत योजनेंतर्गत स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच, वंदे भारत एक्स्प्रेस गाडीसाठी असणाऱ्या डब्यांसारखे डबे या गाडीला लागणार असून, डबे तयार करण्याचे काम सुरू आहे. मार्गाबाबत रेल्वे बोर्ड आणि मंत्रालयीन स्तरावर हालचाली सुरू आहेत. पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, या मार्गांवरून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्याची चाचपणी सुरू आहे. – रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग