शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय काढला मोर्चा
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मणिपूर राज्यात दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. तेथील कुकी या आदिवासी समुदायाला मैतेई समाजाकडून लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ तसेच कुकी आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाने एकत्र येऊन मणिपूर सरकारचा निषेध म्हणून शनिवारवाडा ते कलेक्टर कचेरी असा पायी आक्रोश मोर्चा आयोजित केला होता.
हेही वाचा >>> हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक, जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला मारहाण
यामध्ये सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संस्था पुणे, आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे, सह्याद्री आदिवासी समाज प्रबोधन मंडळ पिंपळे गुरव, गोंड समाज मंडळ पुणे, ट्रायबल डॉक्टर्स फोरम पुणे, बिरसा ब्रिगेड पुणे, बिरसा क्रांती दल, भीमाशंकर तरुण मंडळ धानोरी, सह्याद्री तरुण मंडळ धानोरी आणि महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई या संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पायी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या रॅलीचे रूपांतर नंतर सभेत झाले. यामध्ये आदिवासी महिलांनी आपापले विचार मांडले यामध्ये प्रामुख्याने सुनीता बोराडे, भारती उंडे, शारदा वाडेकर, प्रतीक्षा जोशी, संगीता दगडे, नामदेव गंभीरे, नाना सांगडे, डॉ. संजय दाभाडे तसेच काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार मनोहर जोशी यांनी आपले विचार मांडले. या मोर्चाला पुण्यातील इतर सामाजिक, राजकीय रिक्षा पंचायत हमाल पंचायत या संघटनांच्या अध्यक्षांनी उपस्थित राहून या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. उषा मुंढे, आशा सुपे, रोहिणी चिमटे, गौरीताई लांघी, सीता किरवे, सुनिता बोऱ्हाडे यांनी सर्व संघटनांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.