लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांनी तीन महिलांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. पालखी सोहळ्यात चोरट्यांनी भाविकांचे मोबाइल संच लांबविल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात महिलेचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गुरुवार पेठेत राहायला आहे. महिलेची सून मैत्रिणीसह श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी श्री पालखी विठोबा मंदिरात गेली होती. दुपारी अडीचच्या सुमारास चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीत चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक गोरड तपास करत आहेत.
आणखी वाचा-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील वाद आता चिघळला; एकाची हत्या, भाजपचा ‘हा’ पदाधिकारी ताब्यात
नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर परिसरात श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५२ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत. विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय चौकात पालखीचे दर्शन घेणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला येरवडा भागातील नागपूर चाळ परिसरात राहायला आहे. महिला रविवारी (३० जून) दुपारी पालखीचे दर्शन घेत होती. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.
भाविकांचे मोबाइल चोरीला
पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर दुतर्फा गर्दी झाली होती. गर्दीत चोरट्यांनी भाविकांचे मोबाइल संच चोरून नेले. दर्शन घेताना काहींचे मोबाइल संच पडल्याने गहाळ झाले. याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.