लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या युवकांना भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना केसनंद-थेऊर रस्त्यावर घडली. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अथर्व संतोष हेंद्रे (वय १८, रा. श्रीनाथ अपार्टमेंट, बुधवार पेठ, फलटण, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. अपघातात अनिकेत सुनील जगदाळे, प्रेम पोळ, विवेक ताराळकर (तिघे रा. फलटण) जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालक संतोष शिवाजी नरळे (रा. बंडगर वस्ती, हबिसेवाडी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य शंकरराव गायकवाड (वय ३१, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथील शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान निमित्त ज्योत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री वढू येथून ज्योत घेऊन फलटणकडे निघाले होते. ७० ते ८० कार्यकर्ते सहभागी झाले होते. केसनंद-थेऊर रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार तरुणांच्या गटाला धडक दिली.
अपघातात अथर्वच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अनिकेत जगदाळे, प्रेम पोळ, विवेक ताराळकर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.