पुण्यातील नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने आठ जणांना उडवल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यामध्ये १० ते १२ जण जखमी झाले असून जखमींवर नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सुत्रांकडून कळते.

पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मपाल भारती, रमीज शेख, विलास चांदेलवाल, प्रकाश गोगावले, परशुराम यादव, दशरथ बहिरे, निमराज पाटील, बालाजी अहिरे अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातग्रस्त ट्रक मुंबई-बंगळूरू महामार्गावरील वडगाव धायरीजवळील नवले पुलावरून मुंबईच्या दिशेने जात होता. तामिळनाडूची पासिंग असलेल्या या ट्रकचा नवीन कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान ब्रेक फेल झाला. यानंतर भरधाव ट्रकने आठ जणांना उडवले. ट्रकच्या धडकेत १ दुचाकी, १ आयशर, २ कार आणि २ रिक्षांचे नुकसान झाले. जखमींपैकी एक महिला व दोन पुरुषांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हे ट्रक नारळ घेऊन मुंबईला जात होते. या अपघातामुळे नवले पुलाकडे येणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.