पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात चार वाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचा ट्रक ड्रेनेज लाईन सफाई करण्यासाठी आला होता. त्यावेळी चालकाने ड्रेनेज लाईनपासून काही अंतर ट्रक पुढे घेऊन पुन्हा मागे घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जागेवरच भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे जवळपास ४० फुट खोल खड्ड्यात ट्रक पडला आणि बाजूच्या दोन दुचाकी देखील खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या. ट्रक खाली जात असल्याचे लक्षात येताच, चालकाने बाहेर उडी मारून जीव वाचविला. क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – हिंजवडी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात गांजा विक्री करणारे गजाआड; ३३ किलो गांजा जप्त

हेही वाचा – देणे समाजाचे

सिटी पोस्ट आवारात ट्रक मागे पुढे करीत असताना अचानक भले मोठे भगदाड पडल्याने संपूर्ण ट्रक खड्ड्यात पडला. या घटनेमुळे तेथील रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.