राज्याचे क्रीडा धोरण झाले. ज्येष्ठ नागरिकांचे धोरण करण्यात आले. महिला धोरण लवकरच जाहीर होईल. पुण्याच्या ‘मेट्रो’ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. झोपडीमुक्त शहर करण्यासाठी नवी योजना आणण्यात येणार आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केले.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर खडकीबाजार येथे झालेल्या वचनपूर्ती मेळाव्यात चव्हाण यांच्या हस्ते आमदार विनायक निम्हण यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, उपमहापौर बंडू गायकवाड, शहराध्यक्ष अभय छाजेड आणि माजी आमदार उल्हास पवार या प्रसंगी उपस्थित होते.
प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षामागे भक्कम ताकद उभी करणाऱ्या खडकीकरांचे कौतुक करून चव्हाण म्हणाले,की राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीचा प्रयोग करून बघितला. मात्र, १९९९ मध्ये युतीला हद्दपार करून पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. तोच प्रयोग केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षे केला गेला. मात्र, या दोन्ही राजवटीत आणि काँग्रेसच्या कार्यकालामध्ये विकासाचा आवाका, अनुभव याची तुलना करून जनतेने पुन्हा काँग्रेसच्या विकासावर शिक्कामोर्तब केले. कोणी जातीच्या तर, कोणी धर्माच्या नावावर मते मागत आहेत. मात्र, दलित, अल्पसंख्य आणि वंचित घटकांना एकत्र ठेवणारा काँग्रेस हाच एकमेव धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पाठीशी शक्ती उभी करावी.
जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी विकास योजना (जेएनएनयूआरएम) छावणी भागाला लागू करावी आणि जिल्हा नियोजन बैठकीमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांना विशेष निमंत्रित म्हणून प्रतिनिधित्व मिळावे या मागण्यांसंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे हॉकीची पंढरी असलेल्या खडकीमध्ये अॅस्ट्रोटर्फ स्टेडियम देण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करेन. केंद्राकडून दिरंगाई झाली तर राज्य सरकार ही मागणी पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या वेळी कदम, पाटील, ठाकरे आणि विनायक निम्हण यांनी मनोगत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा