पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला विशेष न्यायाधीश सोनाली राठोड यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी एका ६० वर्षीय शिक्षकाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत शाळकरी मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शिकवणी चालक शिक्षकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ मार्च २०१७ रोजी ही घटना घडली होती.

आरोपी आणि त्याची पत्नी शिकवणी चालक आहेत. पीडित मुलगी आणि तिची मोठी बहीण त्यांच्याकडे शिकवणीला जायचे. पीडित मुलगी चौथीत होती. १५ मार्च २०१७ रोजी शिकवणीला गेली होती. त्या वेळी आरोपीने मुलीशी अश्लील कृत्य केले. त्यानंतर घाबरलेली मुलगी घरी गेली. तिने या प्रकाराबाबतची माहिती आईला दिली. आईने पोलिसांकडे फिर्याद नोंदविल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पिंपरी पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. . पीडित मुलगी, तिची आई आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक रत्नमाला सावंत यांनी साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला. न्यायालयाने आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून आठ हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Story img Loader