चिखली-टाळगाव येथे जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या नावाने संतपीठाची उभारणी करण्याची घोषणा िपपरी महापालिकेने केली, त्यानुसार आवश्यक प्रस्तावही घाईने मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात, वर्ष उलटले तरीही पुढे काहीच होताना दिसत नाही. या प्रकल्पासाठी निश्चित केलेली चिखली गायरानातील सुमारे आठ एकर जागा अद्याप ‘अधिकृत’पणे पालिकेच्या ताब्यात आलेली नाही. शासकीय पातळीवरील नाठाळांच्या दिरंगाईमुळे पालिकेच्या प्रयत्नांनाही बळ मिळत नसल्याचे समोर आले आहे.

सोमवारी (२७ जून) श्री क्षेत्र देहू येथून तुकोबांच्या तर मंगळवारी (२८ जून) आळंदीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील वारकरी सांप्रदायाचे लक्ष वेधून घेतलेल्या संतपीठाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

देहू-आळंदीच्या कुशीत असलेल्या टाळगाव चिखलीत हे संतपीठ सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी गायरानाची सुमारे आठ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. चिखलीतील नगरसेवक दत्ता साने यांनी अशाप्रकारचे संतपीठ सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, यापूर्वीचे आयुक्त राजीव जाधव यांनी संतपीठाचा प्रस्ताव तयार केला. घाईघाईने पालिका सभेत ऐनवेळी दाखल करून तो मंजूरही करण्यात आला. त्याही पुढे जाऊन संतपीठाच्या अभ्यासक्रमाचा

प्राथमिक मसुदा तयार करून अभ्यासक्रमाचे काही टप्पेही निश्चित करण्यात आले.

मात्र, प्रकल्पाची जागाच उपलब्ध होत नसल्याने सगळे ‘कागदी घोडे’ नाचवले जात होते. अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांच्या माध्यमातून महापालिकेने जागेसाठी बराच पाठपुरावा केला. मात्र, अजूनही जागा मंजूर झाल्याचे तोंडीच सांगण्यात येत आहे. शुक्रवार (२४ जून) पर्यंत अधिकृतपणे जागा ताब्यात मिळाल्याचे पत्र पालिकेला मिळाले नव्हते.

संतपीठासाठी महापालिकेच्या वतीने झालेल्या बैठकांना संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आवर्जून हजेरी लावली असून प्रकल्पाच्या जागेची त्यांनी आयुक्तांसमवेत पाहणी केलेली आहे.

नियोजित संतपीठामध्ये सातवाहन कालापासून ते २१ व्या शतकापर्यंतच्या संत साहित्याचा अभ्यास व मराठी संस्कृतीचे संशोधन केले जावे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील सर्वधर्मीय संतांच्या साहित्याचा अभ्यास व्हावा. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अभ्यासकांसाठी सुसज्ज ग्रंथालय व वसतिगृह उभारावे, अशा अपेक्षा त्यांनी महापालिकेकडे व्यक्त केल्या आहेत.

काय आहे संतपीठ

वादन, कीर्तन, गायन, प्रवचन आदी कला अवगत करण्यासाठी नवीन पिढीला प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ‘संगीत अकादमी’च्या धर्तीवर संतपीठाच्या उभारणीचा विचार पुढे आला. वारकरी सांप्रदायातील सर्व कलागुणांचे जतन, प्रसार व शिक्षण ही संतपीठाची संकल्पना आहे. यासाठी आठ एकर जागेचे नियोजन असून प्रारंभी दोन कोटींची तरतूद आहे. डॉ. सदानंद मोरे, बंडातात्या कराडकर, मारूती महाराज कुऱ्हेकर, डॉ. रामचंद्र देखणे आदींचा संतपीठाच्या समितीत समावेश राहणार असून महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष हे पदसिद्ध पदाधिकारी समितीत राहणार आहेत.

संतपीठासाठी जवळपास आठ एकरची जागा ताब्यात आली आहे. अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून येणे बाकी आहे. िपपरी पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू आहे. पदविका, पदवी, संशोधनावर आधारित संतपीठाचा अभ्यासक्रम राहणार आहे.

– तानाजी िशदे, अतिरिक्त आयुक्त, िपपरी महापालिका