तुळशीबागेतील पथारी व्यावसायिकांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी त्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव महापालिकेत तयार होत आहे. या प्रस्तावावर येत्या दोन-तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता असून तीनशे पथारी व्यावसायिकांना महात्मा फुले मंडईतील आर्यन वाहनतळाच्या तळमजल्यावरील जागा देण्याचा प्रस्ताव आहे.
महापालिकेने पथारी व्यावसायिकांची नोंदणी करण्याची जी योजना आखली होती त्या योजनेत तुळशीबाग व परिसरातील तीनशे पथारी व्यावसायिकांची नोंदणी करण्यात आली होती. या सर्वाना आर्यन वाहनतळाच्या तळ मजल्यावर जागा देण्याचा प्रस्ताव आहे. या व्यावसायिकांना पाच फूट गुणिले तीन फूट या आकाराची पथारी तेथे मांडता येईल. तसेच त्यांना तेवढय़ा आकाराची शेड उभारण्याचीही परवानगी देण्यात येणार आहे.
मंडईत उभारण्यात आलेल्या आर्यन वाहतळाच्या तळ मजल्यावर सध्या वाहने उभी केली जात नाहीत. त्यामुळे ती जागा पथारी व्यावसायिकांना देण्याबाबत प्रस्ताव तयार केला जात आहे. या वाहनतळाच्या पहिल्या मजल्यावर वाहने उभी करणे शक्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वाहने उभी करून नागरिकांना खरेदी करता येणार आहे. मंडईच्या परिसरात जी जागा काही ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी यातील काही व्यावसायिकांना जागा देता येईल का, या शक्यतेबाबतही प्रशासनाकडून विचार सुरू आहे. तुळशीबागेतील पथारी व्यावसायिकांना मंडईतील वाहनतळात स्थलांतरित करण्याच्या या प्रस्तावावर येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.
ज्या पथारी व्यावसायिकांची महापालिकेकडे नोंदणी झाली आहे त्यांना पुनर्वसनासाठी जागा दिल्यानंतर पथारी व्यावसायिकांची संख्या वाढण्याचा किंवा अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच त्यानंतरही या परिसरात जे अनधिकृत व्यावसायिक व्यवसाय करतील त्यांच्यावर कारवाई करणेही शक्य होणार आहे.
सिंहगड रस्त्यावर कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी मंडई परिसरात कारवाई केली. मंडईत अनेक व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र तरीही हे व्यावसायिक मंडईत व्यवसाय न करता मंडई बाहेरच्या रस्त्यावर बसून व्यवसाय करतात. मंडई परिसरात चाळीस विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाई बरोबरच सायंकाळी सिंहगड रस्त्यावर अभिरुची मॉलपर्यंत कारवाई करण्यात आली. या कारवाईत साठ हातगाडय़ा जप्त करण्यात आल्या. या रस्त्यावर रोज सायंकाळी मंडई भरते, तसेच इतर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांच्या गाडय़ाही या ठिकाणी उभ्या केल्या जातात. या सर्वावर कारवाई करण्यात आली.

Story img Loader