ग्राहक पेठेतर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वस्त दरातील तूरडाळ विक्रीमध्ये पहिल्या दोनच दिवसांत तब्बल ४० हजार किलो डाळीची विक्री झाली आहे. यात नागरिकांना शंभर रुपये प्रतिकिलो दराने प्रत्येकी २ किलो तूरडाळ दिली जात आहे.
संस्थेतर्फे सोमवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते खजिना विहीर चौक येथील ग्राहक पेठेत तूरडाळ विक्रीस सुरूवात करण्यात आली होती. सोमवार व मंगळवारी प्रत्येकी २० टन तूरडाळीची विक्री झाल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली. स्वस्त तूरडाळ विक्रीसाठी पंचवीसहून अधिक ठिकाणी विक्री केंद्रे उघडण्यात आली आहेत. यात धनकवडी व पेठांमध्ये प्रत्येकी ८ विक्री केंद्रे सुरू झाली असून शिवाजीनगर आणि सिंहगड रस्ता भागातही विक्री केंद्रे चालवली जात आहेत. शहराच्या काही भागात भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही स्वस्त तूरडाळ विक्री सुरू केली आहे. ज्यांना तूरडाळ विक्री केंद्र सुरू करायचे आहे त्यांना ९७ रुपये प्रतिकिलो दराने तूरडाळीची विक्री केली जात असल्याचेही पाठक यांनी सांगितले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींचा भडका उडाल्यामुळे तूरडाळीच्या दरांचा विषय सध्या ऐरणीवर आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी गिरीश बापट यांना शनिवारी पुणेकरांच्या वतीने सुकामेव्याच्या खोक्यातून दिलेली डाळींची भेट गाजली होती. या वेळी धनकवडे व राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्वस्त दरातील डाळ नागरिकांना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. यावर उत्तर देताना बापट यांनी दोन दिवसांत शंभर रुपये प्रतिकिलोने तूरडाळ उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले होते.

Story img Loader