पुणे : यंदाच्या हंगामात उत्पादनात वाढ झाल्याने गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीच्या दरात किलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. तूरडाळीसह चणाडाळीच्या दरात १५ ते २० रुपये, तसेच उडीद डाळीच्या दरात पाच ते सात रुपयांनी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
कर्नाटकातील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला असून, मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा कर्नाटकात तूरडाळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीच्या दरांत प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे.
जून-जुलै महिन्यात तूरडाळीचे दर कडाडले होते. त्या वेळी घाऊक बाजारात एक किलो तूरडाळीला १७५ रुपये किलो असा उच्चांकी दर मिळाला होता. नोव्हेंबरमध्ये दरात दहा रुपयांनी घट झाली. सध्या घाऊक बाजारात डाळीचे प्रतिकिलोचे दर प्रतवारीनुसार १०७ ते १३० रुपये किलोदरम्यान आहेत.
उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर – जयकुमार रावल
नोव्हेंबर २०२४ फेब्रुवारी २०२५
तूरडाळ – १६५ ते १८० रुपये १०५ ते १२० रुपये
चणाडाळ – ८८ ते ९४ रुपये ७५ ते ८० रुपये
उडीद डाळ – ११५ ते १२० रुपये १०० ते ११० रुपये
आवक वाढण्याचा अंदाज
यंदाच्या हंगामात तूरडाळीचे उत्पादन ४४ लाख टन होण्याची शक्यता आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज ८० ते १०० टन तूरडाळीची आवक होत आहे. येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता असून, दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे, असे मार्केट यार्डातील व्यापारी जितेंद्र नहार यांनी सांगितले.
महाराष्ट्र सध्या डाळी उत्पादनात आघाडीवर आहे. येत्या काळात भारत उत्पादनात आत्मनिर्भर होईल. डाळवर्गीय पिकांसंदर्भात या क्षेत्रातील संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्याोग भागधारकांनी सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारल्यास उत्पादन क्षमतेत अधिक वाढ होईल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी व्यक्त केला. नवी दिल्लीत ‘भारत मंडपम’ येथे भारतीय डाळी आणि धान्य संघटनेच्या वतीने आयोजित भारतीय डाळी परिषदेतर्फे ‘समृद्धीसाठी डाळी – शाश्वततेसह पोषण’ या चर्चासत्रात ते बोलत होते.