पुणे : राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर बारा हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी – मार्च महिन्यात दहा हजार रुपयांवर असलेल्या तुरीच्या दरात एप्रिलमध्ये दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जून- जुलैमध्ये तूरडाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना सोमवारी अमरावती बाजार समितीत लाल तुरीला सरासरी ११४०० ते १२००० रुपये, जळगावात ९५०० ते १२००० रुपये, नागपुरात ९५०० ते १२०० रुपये, वाशीम १०३०० ते १२५०० आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये (पांढरी) ८००० ते ८०५० रुपये दर मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाली आहे. शेतकरी बाजारभाव वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत. केंद्र सरकारने सात हजार रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला होता. पण, अपुरा पाऊस, काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस आदी कारणांमुळे उत्पादनात घट येण्याचा आणि दर्जा खालावण्याचा अंदाज असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीचे दर तेजीत आहेत. सात हजार हमीभाव असतानाही तुरीची खरेदी सरासरी नऊ ते दहा हजार रुपयांनी सुरू आहे.

हेही वाचा : उकाड्यापासून दिलासा…आजपासून तीन दिवस पाऊस

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तुरीपासून डाळ तयार करताना कमी उतारा मिळत आहे. दर्जानिहाय १०० किलो तुरीपासून ६५ ते ८० किलो डाळ मिळते. एक किलो डाळ तयार करण्याचा खर्च दहा ते पंधरा रुपये आहे. त्यामुळे जून-जुलैमध्ये तूरडाळीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. म्यानमारमधून अपेक्षित आयात होत नसल्यामुळे तूरडाळीचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : रावेरमधून लढण्यास रोहिणी खडसेंचा नकार, शरद पवारांबरोबर पुण्यात बैठकीनंतर स्पष्टीकरण

डाळीच्या दरात महिन्यात दहा रुपयांनी वाढ

एका महिन्यात तूरडाळीच्या दरात प्रती किलो दहा रुपयांनी वाढ होऊन तूरडाळ १८० ते १९० रुपये किलोंवर गेली आहे. मूग डाळीच्या दरातही दहा रुपयांनी वाढ होऊन १३० ते १५० दर झाला आहे. उडीद डाळीच्या दरातही सरासरी दहा रुपयांची वाढ होऊन दर १४० ते १५० रुपयांवर गेले आहेत. चना (हरभरा) डाळीच्या दरात सरासरी चार रुपयांची वाढ झाली आहे, हरभरा डाळ ८० ते ९० रुपये किलोंवर आहे, अशी माहिती डाळींचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tur dal prices increased as tur dal price is 12000 rupees per quintal pune print news dbj 20 css