लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : खरीप हंगामातील तूर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येऊ लागली आहे. विक्री हंगामाच्या सुरुवातीलाच तूर दहा हजार प्रति क्विंटलवर पोहोचली आहे. हे दर टिकून राहण्याचा आणि चांगल्या तुरीचे दर अकरा हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भात प्रामुख्याने तुरीचे उत्पादन घेतले जाते. मराठवाड्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक सुरू झाली आहे. विदर्भातील बाजारात तूर येण्यास अजून दहा-पंधरा दिवसांचा काळ जावा लागेल. शेतकरी बाजारात मिळणाऱ्या दराचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने तूर बाजारात आणत आहेत. त्यामुळे दरातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-पुण्याहून अयोध्येला जायचंय? थेट रेल्वेसाठी वाट पाहावी लागण्याची चिन्हे

राज्यातील बाजार समित्यांमध्ये रविवारी मिळालेले दर असे, सोलापूर ८५०० ते ९७००, नगर ७५०० ते १०,०००, जालना (पांढरी) ७७११ ते १०५५०, जालना (लाल) ९१०० ते १०,०५१, अकोला ८६०५ ते १०,५५०, अमरावती ८५०० ते १०,०९९, धुळे ८८०५ ते ८८९०, जळगाव ८७०० ते ९७००, नागपूर ८५०० ते १०,३००, छत्रपती संभाजीनगर ८१०० ते ९८९९, आणि बीडमध्ये (पांढरी) ८१०० ते ९८९९ इतका दर तुरीला मिळाला आहे.

विदर्भातील तुरीकडे व्यापाऱ्यांचे लक्ष

राज्यात मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक तूर होते. मराठवाड्याच्या बहुतेक भागात तुरीच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे तुरीची झाडे जमिनीवर पडली होती. वाळलेली तूर भिजल्यामुळे तिचा दर्जा घसरला होता. दर्जा घसलेल्या तुरीला दरही काहीसा कमी मिळत आहे. त्यामुळे व्यापारी विदर्भातील तूर बाजारात येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. विदर्भातील तूर दर्जेदार असेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. विदर्भातील तुरीचा दर्जा, तिच्यापासून मिळणारा उतारा ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी जास्त महत्त्वाचा असेल, असे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

आणखी वाचा-शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा शोध सुरूच

विदर्भातील तूर आठवडाभरात बाजारात येण्यास सुरुवात होईल. काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा फटका न बसल्यामुळे विदर्भातील तुरीचा दर्जा चांगल्या असेल, अशी अपेक्षा आहे. राज्यात उत्पादित होणाऱ्या प्रति शंभर किलोला तुरीपासून ६० ते ७० किलो तूरडाळ मिळत आहे. हा उतारा सरासरीपेक्षा कमी आहे, अशी माहिती कडधान्यांचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tur is 10 thousand rupees per quintal at the beginning of the selling season pune print news dbj 20 mrj