राहुल खळदकर
गणेशोत्सवात नारळाची आवक मोठय़ा प्रमाणावर होते. श्रद्धेपोटी भाविक ‘श्रीं’ना नारळाचे तोरण अर्पण करतात. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने नारळाची उलाढाल घटली आहे. नारळाची विक्री निम्म्याहून कमी झाली आहे.
श्रावण महिन्यानंतर नारळाच्या मागणीत वाढ होते. दिवाळीपर्यंत नारळाला मागणी कायम असते. गणेशोत्सवात तर नारळाच्या विक्रीत दुप्पट, तिपटीने वाढ होते. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने पुणे-मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गणेशोत्सवात नारळाची सर्वाधिक विक्री पुणे आणि मुंबईत होते. यंदा बहुतांश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना मंदिरातच केली आहे. दरवर्षी थाटण्यात येणाऱ्या मंडपाच्या परिसरात नारळाचे तोरण विक्रेते तात्पुरत्या स्वरूपात दुकाने थाटतात. यंदा मात्र, रस्त्यावर दुकाने थाटण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेक भाविक मनोभावे नारळाचे तोरण ‘श्रीं’ ना अर्पण करतात. करोना संसर्गामुळे भाविकांना यंदा लांबूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. तोरण अर्पण करण्यास मनाई असल्याने नारळ विक्रीत मोठी घट झाली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मानाची मंडळे तसेच मुंबईतील लालबागचा राजा आणि श्रीसिद्धिविनायकास भाविक तोरण अर्पण करतात, अशी माहिती मार्केटयार्डातील भुसार बाजारातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी दिली. यंदा तोरण विक्री होणार नसल्याने नारळाच्या मागणीत घट झाली आहे. तोरणासाठी विक्रेते नवा नारळ वापरतात. नवा नारळ कोवळा असतो. नारळाची आवक तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून होते. नारळाच्या सापसोल, मद्रास, पालकोल या जाती आहेत. कर्नाटकातील सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळाला उपाहारगृहचालक आणि खाणावळचालकांकडून मागणी असते. आंध्र प्रदेशातील पालकोल नारळाला घरगुती ग्राहकांकडून मागणी असते. सापसोल, मद्रास आणि पालकोल जातीच्या नारळाचे खोबरे जाड आणि चवीला गोड असते. टाळेबंदीमुळे नारळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे नारळाचे दर तेजीत असल्याचे बोरा यांनी सांगितले.
उपाहारगृहे बंद असल्याने फटका
गणेशोत्सवात पुणे शहरात राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून भाविक येतात. दहा दिवस शहरातील उपाहारगृहे गजबजलेली असतात. यंदाच्या वर्षी करोनामुळे उपाहारगृहे बंद आहेत. शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी गावी परतले आहेत. विद्यार्थ्यांना भोजनाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या खाणावळी बंद आहेत. गणेशोत्सवात उपाहारगृहचालकांकडून नारळाला मोठी मागणी असते. यंदाच्या वर्षी नारळाच्या मागणीत घट झाली आहे.
गेल्या आठवडय़ापासून मार्केटयार्डातील भुसार बाजारात दररोज अडीच ते तीन हजार पोत्यांमधून अडीच ते तीन लाख नारळांची आवक होत आहे. गेल्या वर्षी दररोज पाच लाख नारळांची आवक गणेशोत्सवादरम्यान होत होती. उत्सवाच्या कालावधीत पुणे, मुंबईसह राज्यभरात दररोज ३० ते ४० लाख नारळांची विक्री होते. यंदा मात्र नारळाच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे.
– दीपक बोरा, नारळ व्यापारी मार्केटयार्ड, भुसार बाजार