पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आता शरद पवार समर्थकांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी पिंपळेनिलखचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या पाच माजी नगरसेवकांच्या माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी कामठे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार समर्थकांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सातत्याने शहरातील कार्यकारी समितीच्या संपर्कात असतात. भोसरी, पिंपरी, चिंचवड मतदारसंघातील पाच माजी नगरसेवक शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी रात्री पाच जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर शनिवारी कामठे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. कामठे हे २०१७ मध्ये भाजपकडून महापालिकेवर निवडून आले होते.

नगरसेवकपदाचा कालावधी संपण्यापूर्वी त्यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसर हा उपमुख्यमंत्री पवार यांचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१७ मध्ये या बालेकिल्ल्याला भाजपने तडा दिला. तरीही शहरात अजित पवार यांचे वर्चस्व असून पक्ष संघटनेसह आजी-माजी आमदार, बहुतांश माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे.

काळेवाडीत पक्ष कार्यालय

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत पक्ष कार्यालय उभारण्यात आले. कार्यालयातील फलकांवर शरद पवार आणि जयंत पाटील यांचे छायाचित्र आहे. या कार्यालयातून आता पक्षाचे कार्य चालणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले. शहरात सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहे. शरद पवार, जयंत पाटील यांची वेळ घेऊन कार्यालयाचे उद्घाटन, मेळावा घेण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी समितीचे सदस्य काशिनाथ नखाते यांनी सांगितले.