पुणे : एका लहान मुलीचे वजन वेगाने वाढू लागले. यामुळे तिला दैनंदिन कामे करण्यात अडचणी येण्यासोबतच प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाला. अखेर या मुलीवर बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या शस्त्रक्रियेनंतर तिचे वजन १०६ किलोवरून ८६ किलोपर्यंत कमी करण्यात यश आले आहे.
ही मुलगी १२ वर्षांची आहे. गेल्या तीन वर्षांत या मुलीचे वजन वेगाने वाढू लागले होते. त्यामुळे तिला तिची दैनंदिन कामेही करता येत नव्हती. याचबरोबर तिच्या प्रकृतीलाही गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तिचे नातेवाईक तिला नजीकच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मुलीने तिचा आहार बदलला आणि नियमित व्यायामही सुरू ठेवला. त्यानंतरही तिचे वजन नियंत्रणात आले नाही. यानंतर तिने अंत:स्रावी ग्रंथी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार काही औषधे सुरू करण्यात आली. या औषधांमुळे तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे फार काळ ती ही औषधे घेऊ शकली नाही.
अखेर मुलीच्या नातेवाइकांनी तिला खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉ. सुधीर जाधव आणि त्याच्या पथकाने मुलीची स्थूलता कमी करण्यासाठी सखोल तपासण्या केल्या. बालरोगतज्ज्ञ, अंत:स्रावी ग्रंथी तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर मुलीवर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात तिचा पोटाचा आकार कमी करण्यात आला. पोटाचा आकार शर्टच्या बाहीच्या आकाराप्रमाणे आणि सर्वसाधारणपणे केळीएवढा करण्यात आला. त्यामुळे तिची भूक कमी होऊन वजन कमी होऊ लागले. या शस्त्रक्रियेनंतर गेल्या तीन महिन्यांत मुलीचे वजन हे १०६ किलोंवरून ८६ किलोवर आले आहे. आता ती तिची दैनंदिन कामे अधिक सहजपणे करू शकत आहे.
मुलीच्या वयानुसार साधारणपणे तिचे वजन ४० ते ४५ किलोंच्या जवळपास असणे आवश्यक होते. या मुलीने आहारात बदल आणि व्यायाम यांसारख्या परंपरागत पद्धतींचा अवलंब केला होता, तरी हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे आम्ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आम्ही पोटाचा आकार कमी केला. त्यामुळे अन्न कमी खाल्ले जाऊन वजन कमी होण्यास मदत झाली.- डॉ. सुधीर जाधव, मणिपाल हॉस्पिटल