पुणे : एका गर्भवतीला मोनोॲम्नीऑटिक स्थितीचे निदान झाले. या स्थितीत जुळ्या गर्भांपैकी एकाची वाढ खुंटली होती. त्यामुळे दुसऱ्या गर्भाला धोका निर्माण झाला होता. यामुळे डॉक्टरांनी बायपोलर कॉर्ड ऑक्लुजन प्रक्रियेचा वापर केला. या माध्यमातून महिलेचा एक गर्भ वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गर्भवती सातारा जिल्ह्यातील परिचारिका आहे. त्यांना गर्भधारणेच्या २१ व्या आठवड्यात अल्ट्रा साऊंड चाचणीमध्ये मोनोॲम्नीऑटिक ट्विन्स या स्थितीचे निदान झाले होते. यामध्ये एका अर्भकाची वाढ गंभीररित्या खंडित झाली होती. या दोन्ही अर्भकांची नाळ एकच होती. याचे निदान अल्ट्रासाऊंड चाचणीद्वारे करण्यात आले. एकच नाळ असल्यामुळे या बाळांच्या रक्तवाहिन्या जोडलेल्या होत्या. या परिस्थितीत रक्त हे एका बाळापासून दुसऱ्या बाळापर्यंत वाहत असते, अशी माहिती केईएम हॉस्पिटलमधील डॉ. श्वेता गुगले यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : पत्नीकडून एकाला लाटण्याने बेदम मारहाण, करंगळीचा चावा घेऊन दुखापत; पत्नीविरुद्ध गुन्हा

डॉ. श्वेता गुगले पुढे म्हणाल्या, ‘बायपोलर कॉर्ड ऑक्लुजन ही प्रक्रिया दोन टप्प्यात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात वाढ न होणाऱ्या अर्भकाची नाळ रक्तपुरवठा थांबेपर्यंत गोठविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात गोठविण्यात आलेल्या जागांमधील एका ठिकाणामध्ये फिटोस्कोपीच्या सहाय्याने लेझर कॉर्ड ट्रान्सेक्शन करण्यात आले. यामुळे सामान्यत: वाढणाऱ्या अर्भकाची वाचण्याची शक्यता वाढली आहे. या प्रक्रियेत पहिले २४ तास हे अतिशय महत्त्वाचे होते. त्यानंतर डॉपलर चाचणीचे परिणाम सामान्य दिसून आले. गर्भवतीला आठवडाभरानंतर बचावलेल्या अर्भकाचे मेंदू, हृदय चाचणी आणि डॉपलर चाचणीसाठी बोलविण्यात आले. या चाचण्यांचे परिणाम सामान्य आले आहेत. आता ही गर्भधारणा पुढेही सामान्यपणे सुरू राहील.’

केईएम हॉस्पिटलमध्ये फीटल सर्जन डॉ. मनीकंदन के. यांच्यासह फीटल मेडिसीन तज्ज्ञ डॉ. श्वेता गुगले, केईएम हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक झक्सेस कोयाजी, फीटल मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद कऱ्हाडे तसेच केईएम हॉस्पिटलमधील फीटल मेडिसीन विभागातील सहयोगी सल्लागार डॉ. आश्विनी जायभाये आणि डॉ. पूजा पाबळे यांनी ही प्रक्रिया यशस्वी केली.

हेही वाचा – पुणे : सायबर चोरट्यांकडून ७५ लाखांची फसवणूक

मोनोॲम्नीऑटिक ट्विन्सच्या गर्भधारणांचे व्यवस्थापन अतिशय आव्हानात्मक असते. अर्भकाच्या अनपेक्षित मृत्यूचा धोका १५ ते २० टक्क्यांपर्यंत असतो. त्याशिवाय वाचलेल्या बाळाच्या मेंदूमध्ये गंभीर दुखापतीचाही उच्च धोका असतो. – डॉ. श्वेता गुगले, फीटल मेडिसीन तज्ज्ञ, केईएम हॉस्पिटल

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twin fetuses with same placenta ones growth interruptedfinally doctors decide on bipolar cord occlusion pune print news stj 05 ssb