राहुल खळदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंधन वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना विश्रांतवाडी चौकात सोमवारी घडली. अपघातात मुलींची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी टँकरचालकाला रात्री अटक करण्यात आली.

साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय साडेतीन वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत. अपघातात त्यांची आई किरण सतीशकुमार झा (वय ३८, रा. संत तुकारामनगर, भोसरी) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी टँकरचालक प्रमोदकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या ट्रकला भीषण आग, तिघांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झा कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशातील आहे. सतीशकुमार पुण्यात नोकरी करत होते. सोमवारी ते येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार सतीशकुमार, त्यांची पत्नी किरण, जुळ्या मुली साक्षी आणि श्रद्धा निघाले होते. विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते.

विश्रांतवाडी चौकातील सिग्नल ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वार सतीशकुमार फेकले गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. पत्नी किरण आणि दोन मुली टँकरच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या तिघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा >>> पुणे: ‘मेफेड्रोन’साठी कच्चा माल पुरविणारे सहा आरोपी निष्पन्न; ललित पाटीलसह आरोपींचा शोध सुरू

प्रत्यक्षदर्शींना अश्रृ अनावर विश्रांतवाडी चौकात सिग्नल सुटल्यानंतर टँकरने दुचाकीला धडक दिली. साडेतीन वर्षांच्या जुळ्या मुली आणि त्यांची आई टँकरच्या चाकाखाली सापडल्या. जुळ्या मुलींचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींना अश्रृ अनावर झाले. नागरिकांनी टँकरचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twin toddlers die after speeding tanker hits bike pune print news rbk 25 zws
Show comments