लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: कोथरुडमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले दोन आरोपी मूळचे राजस्थानातील आहेत. राजस्थानात आरोपींविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी फरार झाल्यानंतर पुण्यात वास्तव्यास होते. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

इम्रान खान, युनूस साकी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नाझण गस्त घालत होते. त्या वेळी तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. पोलिसांना संशय आल्याने आरोपी इम्रान खान, युनुस साकी यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला. त्यानंतर खान आणि साकी राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. घरातून एक काडतूस, चार मोबाइल संच, लॅपटाॅप जप्त करण्यात आला.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड भाजपाच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप

चौकशीत खान, साकी आणि साथीदाराविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. एनआयएने त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. ते पुण्यात गेल्या दीड वर्षांपासून वास्तव्यास होते. पुण्यात ते कोणाच्या संपर्कात होते, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नमूद केले.

हेही वाचा… पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील ‘किडनी रॅकेट’ प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान, एनआयएने गुन्हा दाखल केलेले आरोपी रतलाममधील सुफा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते. देशविघातक कारवाई करण्याच्या तयारीत असताना ते पकडले गेले होते. या प्रकरणात एनआयएने गुन्हा दाखल केला होता. पुण्यात पकडलेले आरोपी इम्रान खान, युनुस साकी तेथून पसार झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two accused from rajasthan who absconded in nias crime got arrested in pune print news rbk 25 dvr