पुणे रेल्वे स्थानकातून अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लोहमार्ग पोलिसांकडून अपहरण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.मूळचे झारखंडचे असलेले दाम्पत्य शहरात मजुरी करत आहे. शनिवारी (१० डिसेंबर) रात्री दाम्पत्य मूळगावी निघाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकातील फलाटावर दाम्पत्य थांबले होते. त्यांच्याबरोबर अडीच वर्षांचे बालक होते. त्या वेळी एक महिला आणि तिच्याबरोबर असलेला साथीदार तेथे आले. दाम्पत्याशी ओळख वाढवून दोघांनी गप्पा मारल्या. महिलेने तिच्याकडील खाऊ बालकाला दिला. बालकासाठी आणखी काही खाऊ आणतो, असे सांगून महिला आणि साथीदाराने दाम्पत्याकडे बतावणी केली. बालकाला बरोबर घेऊन दोघेजण तेथून खाऊ आणण्यासाठी गेले.
हेही वाचा >>>पुणेकरांनी अनुभवले वाहनमुक्त रस्ते !; लक्ष्मी रस्त्यावर पादचाऱ्यांचे राज्य
त्यानंतर बालकाला घेऊन दोघेजण पसार झाले. बराच वेळ झाला तरी दोघेजण बालकाला घेऊन न परतल्याने दाम्पत्य घाबरले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. पुणे रेल्वे स्थानक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकाला घेऊन पसार झालेल्या महिला आणि साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.