जालना येथे शंभूराजे नाटकाचे सहा प्रयोग केल्यानंतर निर्मात्याला निम्मेच पैसे देऊन राहिलेले तेरा लाख २१ हजार रुपये न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी जालना जिल्ह्य़ातील दोघांना अटक केली आहे.
अर्जुन महाराज जाधव (रा. अंकुशनगर, शहागड, ता. अंबड, जि. जालना) आणि दत्ता अशोक बहिर पाटील (रा. एकलहरे, ता. आंबड, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनोज जरांगे पाटील याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी धनंजय जयसिंगराव घोरपडे (वय ४७, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे हे शंभूराजे नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचे सहा प्रयोग जालना येथे करण्याच्या बदल्यात तीस लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार जालना येथे नाटकाचे सहा प्रयोग केल्यानंतर आरोपींनी त्यांना १६ लाख ७९ हजार रुपये दिले. उरलेले १३ लाख २१ हजार रुपयांचे एका नागरी सहकारी बँकेचे तीन धनादेश दिले. मात्र, हे तिन्ही धनादेश वटले नाहीत. त्यामुळे घोरपडे यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांना आरोपींनी शिवीगाळ केली आणि उरलेले पैसे दिले नाहीत. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली, असे कोथरुड ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा