लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने दोन कोटी ९३ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी क्रिप्टोबिझ कंपनीच्या संचालकासह साथीदाराला सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून महागड्या मोटारीसह इलेक्ट्रॅानिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्राथमिक तपासात ४३ हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

राहुल विजय राठोड (वय ३५, रा. ब्लूरिच सोसायटी, हिंजवडी), ओंकार दीपक सोनावणे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत रवी शंकर पाटील यांनी फिर्याद दिली होती.

आणखी वाचा- पुणे-मुंबई महामार्ग अपघात: ‘त्या’ १३ जणांचे ढोल ताशा वादन ठरले शेवटचे! व्हिडीओ आला समोर

पाटील यांना क्रिप्टोबिझ कंपनीच्या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे अमिष दाखविण्यात आले होते. त्यानंतर पाटील यांनी गुंतवणूक केली. सुरवातीला वेळोवेळी त्यांना गुंतवणुकीवर परतावा देण्यात आला होता. पाटील यांनी आणखी रक्कम गुंतविली. त्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. पाटील यांनी राठोड यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

प्राथमिक तपासात आरोपी राठोड आणि साथीदाराने सुमारे दोन कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी फसवणूकीसाठी क्रिप्टोबिझ एक्स्चेंज आणि क्रिप्टोबिझ या अ‍ॅपचा वापर केला. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेऊन दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन दुचाकी, एक मोटार, लॅपटाॅप, मोबाइल संच, पेन ड्राईव्हसह इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, उपनिरीक्षक तुषार भोसले, सचिन जाधव, संदीप कदम, संतोष जाधव, नवनाथ कोंडे, प्रवीण राजपुत, बापू लोणकर आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader