पुणे : संक्रातीतील पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिक, तसेच पक्ष्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून नायलॉन मांजाची रिळे जप्त करण्यात आली. बिबवेवाडी आणि धानोरी भागात ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>> सराइताला जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे; आरोपीकडून बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका जप्त
बिबवेवाडी भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर परिसरात एक जण नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस शिपाई सुमीत ताकपेरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून नायलॉन मांजाची ५० रिळे जप्त केली. जप्त केलेल्या मांजाची किंमत दहा हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदेशाचा भंग करणे, तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये अप्पर इंदिरानगर येथील एका तरुणाविरुद्ध याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सुमीत ताकपेरे यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार आंग्रे तपास करत आहेत.
हेही वाचा >>> मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
विश्रांतवाडी भागातील मुंजाबा वस्तीत नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून नायलॉन मांजाचे रिळ जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस कर्मचारी नागेश कुंवर यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार केंद्रे तपास करत आहेत.