पुणे : हडपसर भागात चार वर्षांपूर्वी एकाचा खून करुन पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने पकडले. आरोपी गेले चार वर्ष पोलिसांना गुंगारा देत होते.शुभम कांबळे, आनंद माने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हडपसर भागात बसवराज कांबळे (रा. गंगानगर, फुरसुंगी) यांचा चार वर्षांपूर्वी आरोपी हेमंत नाईकनवरे आणि साथीदारांनी खून केला होता. खून प्रकरणात पोलिसांनी नाईकनवरे आणि साथीदारांना अटक केली होती. मात्र, खून प्रकरणातील सहआरोपी कांबळे आणि माने पसार झाले होते. गेले चार वर्ष ते ओळख लपवून वेगवेगळ्या भागात वास्तव्य करत होते. गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. दोघे जण गंगानगर स्मशानभूमी परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी विनोद शिवले, अकबर शेख, अमित कांबळे यांना मिळाली.
पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी खून केल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस कर्मचारी विनोद शिवले, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, पृथ्वीराज पांडुळे यांनी ही कारवाई केली.
© The Indian Express (P) Ltd