पुणे : सराइताने पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना लोहियानगर भागात घडली. याप्रकरणी सराइतासह तिघांना अटक करण्यात आली असून, त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सराइत गुंड अभिषेक उर्फ बुचड्या ससाणे, कुणाल ससाणे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी ससाणेची आई, पत्नी, मावशी, त्याचा बराेबर असलेल्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष साबळे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, लोहियानगर भागातील एका किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानदाराला ससाणे याने धमकाविले होते. किराणा दुकानदाराने ससाणेविरुद्ध तक्रार दिल्यानंतर सोमवारी (१० मार्च) त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्या वेळी ससाणे, त्याचा मित्र विवेक उर्फ दांड्या अडागळे हे लोहियानगर पोलीस चौकीत आले. त्यांनी पोलीस चौकीत गोंधळ घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. ससाणे याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा आरोपीने ससून रुग्णालयात गोंधळ घातला. सरकारी अडथळा आणल्याप्रकरणी ससाणे याच्यासह भावाला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.

खंडणीचा गुन्हा दाखल

लोहियानगर भागातील दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी सराइत अभिषेक ससाणे, विवेक अडागळे यांच्याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत किराणा माल दुकानदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससाणे आणि त्याचा मित्र अडगाळे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दुकानात आले. दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक भारत बोराडे तपास करत आहेत.

Story img Loader