लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : बेकायदापणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई सांगवी आणि बावधन येथे करण्यात आली.
रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २३, रा. प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील गणपती विसर्जन घाटावर रोहित पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून रोहितला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल व दोन हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
आणखी वाचा-पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले
दुसऱ्या कारवाईत केशव त्रिंबक काळे (वय २४, रा. हिवरे, भोजेवाडीता, जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक तौसिफ महात यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केशव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, पाच लाख रुपयांची एक मोटार, ९० हजारांची रोकड असा सहा लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.