पिंपरी : गुन्हे शाखेने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. रफिक उमर जमादार (वय ३७, रा. मोशी), नीलेश मनोहर गायकवाड (वय ३०, रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला जात होता. सराईत गुन्हेगार रफिक आणि नीलेश यांनी चोरी केलेल्या दुचाकी विक्री करण्यासाठी केएसबी चौक आणि एमआयडीसी ब्लॉक दोन येथे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त केल्या. त्यांनी चिखली, पिंपरी, भोसरी, चाकण, शिवाजीनगर, निगडी पोलीस ठाण्यांतील हद्दीत केलेले वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.