पुणे : पुण्यातील धनकवडी येथे रस्त्याने पायी जाणार्या एका नागरिकाला मुद्दाम धक्का मारल्यानंतर त्याच्या पाया पडण्याचे नाटक करून खिशातील ३० हजार रुपये चोरल्याची घटना घडली. तर या प्रकरणातील दोन आरोपींना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी साद अकबर पठाण (वय २३ रा. गल्ली क्रमांक ७ ए वेस्टर्न बेकरी गल्ली, सय्यदनगर, हडपसर) आणि आस्लम इस्माइल शेख (वय २१ रा. बिल्डींग नं. ३, फ्लॅट नं. २०६, नवीन म्हाडा, सातवाडी, हडपसर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ९ एप्रिल रोजी धनकवडी येथील शाहू बँकेच्या समोरून पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी साद अकबर पठाण आणि आरोपी आस्लम इस्माइल शेख हे दोघेजण दुचाकीवरून येऊन अचानक फिर्यादीला धक्का दिला.
त्यानंतर दोघा आरोपींनी आम्हाला माफ करा असे म्हणत पायी पडण्याचे नाटक केले.तेवढ्यात आरोपींनी फिर्यादी च्या खिशातील तब्बल ३० हजार रुपये चोरले आणि घटना स्थळावरून पसार झाले.पैशांची चोरी झाल्याचे काही मिनिटात फिर्यादीच्या लक्षात येताच सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देताच, त्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमांतून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर दुचाकीच्या नंबरवरून आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. तर या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्ह्य़ात वापरण्यात आलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच या दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.