पिंपरीत अपहरण झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आल्याची घटना उघड झाली. पोलिसांनी तत्परता दाखवत दोन तरुणांना बेड्याही ठोकल्या. मात्र, यासंदर्भात उलटसुलट दावे करण्यात येत असल्याने खुनाचे खरे कारण गुलदस्त्यातच राहिले आहे.आदित्य गजानन ओगले (वय ७, रा. मासूळकर कॉलनी, पिंपरी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मंथन किरण भोसले (वय २१, उद्यमनगर, रा. मासूळकर कॉलनी, पिंपरी) आणि अनिकेत श्रीकृष्ण समदूर (वय २१, रा. घरकुल, चिखली) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारा हरियाणातील चोरटा गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी आदित्य बेपत्ता झाला. बराच शोध घेतल्यानंतरही तो न सापडल्याने अपहरणाची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात पोलिसांना महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले. भोसरी एमआयडीसीतील बंद पडलेल्या एका कंपनीत आदित्यचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सुरुवातीपासून परस्परविरोधी माहिती दिली जात आहे. आरोपींनी २० कोटींची मागणी केली होती, असे सांगतानाच मुख्य आरोपीचे सोसायटीतील वर्तन वादग्रस्त होते. त्यामुळे त्याला सहा महिन्यांसाठी सोसायटीतून बाहेर घालवण्यात आले व त्या रागातून आरोपींनी मुलाचा खून केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.सध्या प्राथमिक स्थितीत तपास आहे. सर्व शक्यता गृहीत धरून प्रत्येक गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Story img Loader