भीमाशंकरच्या जंगलातून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापांची तस्करी करणाऱ्या दोघांना चिंचवड परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे दोन मांडूळ साप जप्त करण्यात आले आहेत. या दोघांनी यापूर्वीही अशी विक्री केली का, याचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
चिंचवड परिसरात मांडूळाची विक्री करण्यासाठी दोन तरुण येणार असल्याची माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शांताराम हांडे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. माने यांच्या पथकाने वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्ती पुलाजवळ सापळा रचून सोमवारी रात्री दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नवनाथ किसन ठाकर (वय २२, रा. देवाची आळंदी, ता. खेड), स्वप्निल मुरलीधर मधे (वय २२, रा. खराळवाडी, पिंपरी. मूळगाव-सदुंबरे, ता. मावळ) अशी त्यांनी नावे सांगितली. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कापडाच्या पिशवीमध्ये विक्रीस व जवळ बाळगण्यास बंदी असलेले दोन मांडूळ जातीचे साप आढळून आले. या दोन सापांची किंमत दहा लाख रुपये असून त्यांनी भीमाशंकरच्या जंगलातून हे साप पकडून आणल्याचे सांगितले. या दोघांवर वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी या पूर्वी देखील मांडूळ सापाची विक्री केली आहे का, तसेच पुण्यात ते हे साप कोणाला विक्री करणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत. या दोघांकडून जप्त करण्यात आलेले मांडूळ हे सर्पोद्यानात सोडण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे कलम लावावे
तस्करी करून आणलेल्या या सापाला दुतोंडी मालन किंवा मांडूळ म्हटले जाते. या सापाची शेपटी ही तोंडासारखी दिसते. अंधश्रद्धावाले किंवा बुबावाजी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्याकडे येणाऱ्यास हा साप सहा महिने सरळ तर सहा महिने उलटा चालत असल्याचे सांगतात. तसेच, याला जाळल्यानंतर पैशाचा पाऊस पडेल, गुप्त धन मिळेल, असे सांगतात. त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीलाच जंगलातून हे मांडूळ आणण्यास सांगितले जाते. बऱ्याच वेळेला अशा प्रकरणात सापांची तस्करी करण्यामध्ये सर्पमित्र सहभागी असतात. या प्रकरणी वन्य प्राणी संरक्षण कायद्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यातील कलमांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली.