पुणे : जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एसएसआरपी) बसविणारी दोन अधिकृत केंद्रे कुठलीच पूर्वकल्पना न देता बंद ठेवल्याने अनेक वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. संबंधित केंद्रे ज्या कंपनीची आहेत, त्या ‘रोजमार्टा कंपनी’ला आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयालाही (आरटीओ) केंद्रे बंद करण्यात आल्याची माहिती नव्हती. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अखेर कंपनी आणि प्रशासनाला जाग आली.
‘उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाटीसाठी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून मी पैसे भरले. सिंहगड रस्त्यावरील केंद्राची निवड केली. पाटी बदलण्यासाठी ११ मार्च रोजी दुपारी १२ ते ३ अशी वेळ निश्चित झाली. त्यानुसार पाटी तयार झाली असल्याचा संदेशही प्राप्त झाला. मात्र, संबंधित केंद्रावर मंगळवारी गेल्यानंतर ‘एचएसआरपी’ केंद्र बंद केल्याचे समजले. ‘सात मार्चनंतरच्या नोंदणीकृत वाहनचालकांना ‘रोजमार्टा कंपनी’ नवीन ‘केंद्र’ सुनिश्चित करून देईल. त्यासाठी मदत क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे पत्रक कार्यालयाच्या काचेवर लावले होते.
या मदत क्रमांकावर काहीच प्रतिदास मिळत नव्हता. मी एक ज्येष्ठ व्यक्ती आहे. अशा वेळी कोणाला दाद मागायची? दोन दिवसांत परगावी जायचे असल्याने ही तारीख निवडली होती,’ असे जयंत पाठक यांनी सांगितले. दरम्यान, सुरक्षा क्रमांक पाटीसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश ‘आरटीओ’ प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
‘रोजमार्टा कंपनी’च्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना होती, तरीही त्यांनी ‘आरटीओ’ला कळविले नाही. त्यामुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीला खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या केंद्रावर पाटी लावण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या वाहनधारकांना जवळचे पर्यायी केंद्र उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</p>
केंद्रचालकाकडे अतिरिक्त मनुष्यबळाची कमतरता आणि नियोजनाचा अभाव असल्याने केंद्र बंद केल्याचे त्याने सांगितले. केवळ एकाच केंद्रचालकाकडून आम्हाला पूर्वकल्पना दिली गेली होती. या केंद्रांवर ज्या वाहनचालकांनी नोंदणी केली आहे, त्यांना जवळील पर्यायी केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल. तसा संदेश वाहनचालकांना लवकरच मोबाइलवर पाठविला जाईल.
श्रीपाद जंगम, विभागीय व्यवसाय प्रमुख, रोजमार्टा प्रा. लि.