पुणे: कौटुंबिक वाद, संपत्ती, तसेच वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करण्यात आले. आंदेकर यांच्यावर कोयत्याने तब्बल २४ वार करण्यात आले. पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर आणि दुसरी गोळी कंठात शिरल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदेकर यांचा नाना पेठेत रविवारी (१ सप्टेंबर) खून  करण्यात आला. खूनात घटनास्थळावर पाच पुंगळ्या मिळाल्या होत्या. आंदेकर यांना नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याची माहिती मिळाली नव्हती. प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्यांच्यावर १४ वार झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. शवविच्छेदन केल्यानंतर अंतिम अहवालात आंदेकर यांना दोन गोळ्या लागल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर २४ वार झाले असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. दोन गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर आणि दुसरी  गोळी कंठाजवळ लागली आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपींकडून तीन  पिस्तुले जप्त करण्यात आले आहे. मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडने वर्षभरापूर्वी मध्यप्रदेशातून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमनाथचा साथीदार निलेश आखाडेचा नाना पेठेत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आंदेकर टोळीने खून केला होता. आखाडेचा मित्र अनिकेत दुधभाते याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणात सोमनाथ, अनिकेत, तसेच आंदेकरची बहीण, मेहुण्यासह १५ आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.  आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two bullets entered vanraj andekar body according to the postmortem report pune print news rbk 25 amy