पिंपरी: चिखलीतील जाधववाडीत डेंग्यूसदृश आजाराने पाच आणि दहा वर्षीय अशा दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही उपचारासाठी पुण्यात दाखल होते. त्यांचे डेंग्यू चाचणी अहवाल नकारात्मक आहेत. पण, लक्षणे डेंग्यूची होती.
पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या तीन महिन्यात शंभर जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलै महिन्यात ३६ तर ऑगस्टमध्ये ४० बाधित रुग्ण आढळले होते. डेंग्यूशिवाय चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही शहरात वाढत आहे.
आणखी वाचा-पुणे: रेल्वेतून फटाक्यांची पिशवी घेऊन जाताना सुरक्षा दलाचा श्वान पकडतो तेव्हा…
जाधववाडीतील पाचवर्षीय बालकाला डेंग्यूसदृश आजारामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने १९ सप्टेंबर रोजी बालकाचा मृत्यू झाला. तर, जाधववाडीतीलच १० वर्षीय मुलीला डेंग्यूसदृश आजारामुळे ४ सप्टेंबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
डास उत्पत्ती स्थळे तत्काळ नष्ट करा, अन्यथा कारवाई
औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे, व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डास उत्पत्ती स्थळे तत्काळ नष्ट करावीत. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
आणखी वाचा-पुण्यात रस्ते दुरुस्तीसाठी ‘पॉलिमर काँक्रिट’चा प्रयोग
चिखली जाधववाडीतील मृत्यू झालेल्या दोन्ही बालकांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे होती. त्यांचे डेंग्यू चाचणी अहवाल नकारात्मक आहेत. दोघेही उपचारासाठी पुण्यात होते. त्यांच्या वैद्यकीय अहवालाद्वारे इतर माहिती घेतली जात आहे. -डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी-चिंचवड महापालिका
शहरात डेंग्यू, चिकुनगुण्या तसेच हिवताप यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घ्यावी. आठवड्यातून किमान एक कोरडा दिवस पाळावा. -शेखर सिंह, आयुक्त