पुणे : कौटुंबिक वादातून आईने अडीच वर्षांची मुलगी आणि सव्वा वर्षांच्या मुलाची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात शनिवारी घडली. दोन मुलांची हत्या करुन महिलेने गाढ झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने वार करुन त्याचा खुनाचा प्रयत्न केला. आईनेच दोन मुलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर स्वामी चिंचोली गाव परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी आईला दौंड पोलिसांनी अटक केली.

पियू दुर्योधन मिंढे (वय अडीच), शंभू दुर्योधन मिंढे (वय सव्वा वर्ष) अशी या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी कोमल दुर्योधन मिंढे (वय ३०) हिला अटक करण्यात आली आहे. तिने गाढ झोपेत असलेले पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३६) यांच्यावर कोयत्याने वार केले. तिने केलेल्या हल्ल्यात दुर्योधन जखमी झाले असून, त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

दुर्योधन मिंढे एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत. सध्या ते घरातून काम करतात. त्यांची पत्नी कोमल शिक्षित आहे. मिंढे कुटुंबीय स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्ती भागात राहायला आहेत. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कोमलने ओढणीने पियू आणि शंभू यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गाढ झोपेत असलेल्या दुर्योधन यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. दुर्योधन यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. दुर्योधन यांचे आई-वडील, भाऊ झोपेतून जागे झाले. जखमी अवस्थेतील दुर्योधन यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहायक फौजदार गोरख मलगुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल

दुर्योधन मिंढे, त्यांची पत्नी कोमल उच्चशिक्षित आहेत. कौटुंबिक वादातून कोमलने अडीच वर्षांची मुलगी आणि सव्वा वर्षांच्या मुलाचा ओढणीने गळा आवळून हत्या केली. कौटुंबिक वादातून तिने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्वामी चिंचोली परिसरात शोककळा पसरली.

Story img Loader