पुण्यात मध्य प्रदेशातून मोठा शस्त्रसाठा घेऊन येणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना संघटित गुन्हेगारी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सहा पिस्तुलं, एक रिव्हॉल्व्हर, एक गावठी कट्टा अशी एकूण आठ शस्त्रे आणि २४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अस्लम सलीम खान (वय ३३, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) आणि मतीन उर्फ पैलवान बशीर शेख (वय ३३, रा. जुनाबाझार, नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी संघटित गुन्हेगारी पथकाचे पोलीस शिपाई संतोष धादवड यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.  संघटित गुन्हेगारी पथकाचे पोलीस कर्मचारी तानाजी उर्फ बुवा कांबळे यांना दोन सराईत गुन्हेगार चंदननगर येथे शस्त्रसाठा घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक बापू कुतवळ यांनी शुक्रवारी सापळा रचून दोघांना अटक केली.त्यांच्याकडून आठ अग्निशस्त्रे, २४ काडतुसे जप्त करण्यात आली.
याबाबत कुतवळ यांनी सांगितले की, मतिन शेख हा नगर येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खून, अपहरण, जाळपोळ, मारामारी असे पाच गुन्हे दाखल आहेत. जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रं ही शेख यानेच मध्य प्रदेश येथील रवि नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगत आहे. खान हा येरवडा येथे राहणारा असून त्याच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. दोघेही सध्या जमीन खरेदी-विक्री व केबल नेटवर्कचा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर दाखल असलेल्या कुमार पिल्लेचा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. पैशाच्या देण्या-घेण्यावरून झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी खान याने शेखकडून ही शस्त्रास्त्रं घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दोघांना न्यायालयाने दोन मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.